नागपूर : देशात अराजक घडवण्याचे स्वप्न बघणाऱ्यांच्या विरोधात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांना मदत करतो. मात्र हे पक्ष अराजकास कारणीभूत असणाऱ्यांना गाडण्याऐवजी मलाच गाडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली. मानगुटीवर बसलेले सत्ताधाऱ्यांचे ‘भूत’ उतरविण्यास प्राधान्य देण्याचा सल्ला त्यांनी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हिंदूंना एकत्र करण्यासाठी RSS ला प्रकाश आंबेडकरांचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

मनुस्मृती दहन दिनानिमित्त सोमवारी येथे आयोजित स्त्रीमुक्ती परिषदेत आंबेडकर बोलत होते. वाघ म्हणो किंवा वाघोबा, तो आपल्याला खाणारच आहे. त्यामुळे मी इतक्या जागा लढणार, मी तितक्या जागा लढणार या वादात पडू नये. २-३ जागा कमी मिळाल्या तरी चालतील, मात्र मोदी गेले पाहिजेत, असे ते म्हणाले. मोदींच्या चुकांवर प्रश्न विचारून आपण त्यांना अडचणीत आणू शकतो. देशात दबावाचे राजकारण सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हा सारा खटाटोप केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक कार्यकर्त्यांने ५०० मतदार गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी प्रसंगी मत विकत घ्यावे लागेल तरी चालेल, असे आंबेडकर म्हणाले.

संघाला सल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील हिंदूंना एकत्र आणायचे असेल त्यांनी हिंदू धर्मशास्त्र विद्यापीठाची स्थापना करावी आणि प्रत्येक मंदिरातील पुजारी या विद्यापीठाचा पदवीधर असावा असा कायदा तयार करावा. मग पुजारी कुठल्याही जातीचा असला तरी चालेल, असे आंबेडकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar advice to india alliance for defeating narendra modi zws
Show comments