बुलढाणा : शिवसेनेतील बंडाळीनंतर पन्नास खोके सारेच ओकेचा नारा गुंजला. यानंतर त्याचे पडसाद विधानसभा परिसर ते वेळोवेळी होणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या जाहीर सभा, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रचार सभा, एवढेच काय कोणत्याही कार्यक्रमात हा नार गुंजत राहिला, आरोप होतच राहिले. सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही पन्नास खोके गाजताहेत. नेते सांगायचे विसरले तरी ठाकरे गटाचे शिवसैनिक हा नारा देत नेत्याला त्याची आठवण करून देतात.
सोमवारी, ११ नोव्हेंबर रोजी हे सर्व आठवायचे कारण की, राज्यातील एका नेत्याने प्रचार सभेत पुन्हा खोक्यांची आठवण करून दिली आहे. आरोप खोक्यांचाच आहे, आकडा दहा खोक्यानी कमी आहे आणि वाटप नेत्यांऐवजी मतदारांत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढाच काय तो फरक आहे. हा आरोप करणारा नेता मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाही! मात्र हा नेता राजकीय भूमिकेमुळे टीकेचा धनी ठरलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर आहे.त्यांनी हा खोक्यांचा बॉम्ब टाकलाय! बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जाती करिता राखीव मेहकर विधानसभा मतदारसंघात
वंचित आघाडीतर्फे ऋतुजा चव्हाण रिंगणात आहे.
हेही वाचा…गडचिरोलीत महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार? शेतकरी कामगार पक्षाचा दावा…
काय बोलले बाळासाहेब ?
ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मेहकर मध्ये उर्दू शाळा क्रमांक तीन परीसरातील स्वतंत्र मैदानात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मेहकर मतदारसंघात वाटण्यासाठी चाळीस खोके आल्याचा खळबळजनक आरोप केला. यावेळी त्यांनी पक्षाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्याचा रोख युतीकडे होता. यावेळी आंबेडकर म्हणाले की, मेहकर मतदारसंघात एक एक मत दहा हजार रुपयाला विकले जाण्याची शक्यता आहे. कारण मला माहिती मिळाली की , कुठे कुठे चाळीस कोटी रुपये आलेत.मेहकरात देखील चाळीस कोटी रुपये आले आहे.ते कुठे कुठे आहेत याची मला संपूर्ण माहिती मला आहे. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सल्लावजा आवाहन देखील त्यांनी केले. ते म्हणाले की, पोलिसांनो धाडी टाकाल का? मी यादी देतो.
हेही वाचा…दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
माझे म्हणणे आहे की, धाडी टाकू नका हा पैसा वाटून खा ! खिशात घालून मोकळे व्हा!असे थेट आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी कितीही पैसे वाटले तरी खुशाल वाटू द्या, पण मतदान मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार ऋतुजा चव्हान यांनाच करा.उद्याच्या पिढीचे अधिकार कायम ठेवायचे असेल तर वंचितला मत द्या असे ही ते आंबेडकर यांनी केलेल्या या आरोपाने मेहकर मतदारसंघात खळबळ उडाली आहे.मात्र याचे पडसाद संपूर्ण राज्यात, विधानसभा निवडणुकीच्या विविध विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये उमटणार हे निश्चित. यामुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. याची दखल निवडणूक आयोग घेण्याची शक्यता नाकारता येत आहे.