गडचिरोली : मागील दहा वर्षात लाखो श्रीमंत हिंदू कुटुंबांनी देश सोडले, वादग्रस्त निवडणूक रोखे प्रकरण, बंदी घातलेल्या औषध कंपन्यांना पुन्हा परवानगी देणे, देशातील अराजक वातावरण अशा मुद्द्यांवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोदींविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल करीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज काँग्रेस आणि भाजपात मॅच फिक्सींग असल्याचा घणाघाती आरोप केला.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हितेश मडावी यांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आंबेडकर पुढे म्हणाले, भाजपने बोफोर्स तोफांच्या खरेदी प्रकरणात राजीव गांधींना बदनाम केलं. परंतु आता मोदी आणि भाजपने इलेक्टोरल बॉन्डस च्या माध्यमातून १२ हजार कोटी रुपये वसूल केले. २१८ कोटी रुपयांचा नफा असलेल्या एका कंपनीने १३०० कोटी रुपयांचे बॉन्डस कसे खरेदी केले? अशाचप्रकारे टमाटरची साठवणूक करुन एका महिन्यात ४५ लाख कोटी रुपयांचा निधी जमविण्यात आला. मागील काही वर्षांत ५० कोटी रुपयांची मालमत्ता असलेली भारतातील १६ लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेली, हे मोदी आणि भाजपसाठी लज्जास्पद असल्याचे सांगून आंबेडकर यांनी या सर्व प्रश्नांविरोधात काँग्रेसचे तोंड गप्प का आहे, असा सवाल केला.
हेही वाचा…नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
काँग्रेसला देशात सत्ता हवी आहे तर त्यांनी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी फारकत का घेतली, अशा प्रश्नांची सरबत्तीही आंबेडकर यांनी यावेळी केली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, उमेदवार हितेश मडावी यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, गजानन बारसिंगे, माया भजगवळी, प्रज्ञा निमगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…खरी शिवसेना म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंचे दिल्लीत मुजरे, हुजरे… सुषमा अंधारे यांची खोचक टीका
भाजपा दीडशे पर जाणार नाही
काँग्रेस भुरटा चोर, तर भाजप डाकू आहे. चारशे जागा निवडून येतील, असे भासवून मोदी भीती दाखविण्याचं राजकारण करीत आहे. परंतु भाजप दीडशेपेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाही. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने २०२९ मध्ये निवडणुका होणारच नाही, भारताचा नकाशा बदललेला असेल तसेच मणीपूरसारखी परिस्थिती देशाच्या इतर भागात होईल, असे भाकीत केले आहेत, ते उगीच नाही. भाजप आदिवासी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा अशी भांडणं लावण्याचे काम करीत आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.