अकोला : देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. शशी सिंग नावाच्या व्यक्तीने वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’मध्ये समावेश करण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्विट केले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्या ट्विटचे छायाचित्र शेयर करत ‘ना कबुतर, ना फोन, कुछ नही आया’ असे म्हणत हे फेक असल्याचे स्पष्ट केले. ही तर काँग्रेसची कार्यपद्धती असल्याची टीकादेखील त्यांनी केली.
‘इंडिया’ची दोन दिवसीय बैठक मुंबईत होणार आहे. ‘इंडिया’ नावाखाली विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. सत्ताधारी भाजपा विचारधारेच्या विरोधातील सर्वपक्षांनी यामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. ‘इंडिया’ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
हेही वाचा – “भक्तांच्या मनातून देव निघत नाही…”, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने विविध तर्क
हेही वाचा – गोंदिया: ७० हजाराच्या लाचप्रकरणात वडेगावच्या सरपंचासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आमचे दरवाजे उघडे असल्याचे यापूर्वीच जाहीर केले. दरम्यान, वंचितच्या ‘इंडिया’तील समावेशावरून तर्क-वितर्क लावले जात असतानाच एक फेक ट्विट करण्यात आले. शशी सिंग नावाच्या व्यक्तीने केलेल्या या ट्विटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’मध्ये समावेशावरून ॲड. प्रकाश आंबेडकर व अशोक चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्याचा स्क्रिनशॉर्ट शेयर करत हा फेक मॅसेज असल्याचे ट्विट केले. ‘ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे. कुठलाही पत्रव्यवहार न करता हे लोकांना सांगत फिरतात,’ अशा शब्दात ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.