अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. ते विरोधकांचीही कामे सहजतेने पूर्ण करतात. त्यामुळे शक्यतोवर त्यांच्यावर टीका-टिप्पणी होत नाही. मात्र, एका प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी नितीन गडकरींवर टीकास्त्र सोडले आहे. अकोला शहरातील क्षतिग्रस्त उड्डाणपुलामुळे घोर निराशा झाली. शेकडो कोटींची फळे अकोलेकरांना सहा महिनेसुद्धा चाखता आली नाहीत, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर निशाणा साधला.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करीत क्षतिग्रस्त उड्डाणपुलावरून नाराजी व्यक्त केली. शहरातील मध्यवर्ती भागात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू करण्यात आली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. अशोक वाटिका चौक, अमरावती मार्ग व टॉवर चौकात पुलावरून ‘रॅम्प’ मार्ग ठेवण्यात आला, तर बसस्थानक चौकात भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्यांच्या आत १९ डिसेंबर २०२२ रोजी खचला. या मार्गाखालून गेलेली ६०० मिलीमिटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव बाहेर येऊन वाहून गेला. परिणामी, हा मार्ग बंद करावा लागला. गेल्या सात महिन्यांपासून या पुलाचे दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. अद्यापही हे कार्य पूर्ण झाले नसल्याने पुलावरून अमरावतीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या प्रकरणावरून आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
हेही वाचा – नागपूर: भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमितला अखेर अटक
हेही वाचा – डोळे आलेले सर्वाधिक रुग्ण बुलढाण्यात, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी महिन्यातून दोनदा अकोल्यात येतो आणि प्रत्येक वेळी किमान पाच दिवस तरी राहतो. माझे वाहन अशोक वाटिका चौकातून जाते, जे की शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तेव्हा मला अपेक्षा असते की, कोसळलेला उड्डाणपूल दुरुस्त होऊन कार्यान्वित झाला असेल. पण, मी प्रत्येक वेळी निराश होतो. मला या प्रश्नावर चर्चा करायची नाही की या विलंबासाठी कोण जबाबदार आहे? नगरसेवक, आमदार की खुद्द केंद्रीय मंत्री? मला एवढंच दिसतंय की, अकोल्यातील जनतेने कर स्वरुपात भरलेल्या शेकडो कोटींची फळे त्यांना सहा महिनेसुद्धा चाखता आली नाहीत, कारण, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याच्या सहा महिन्यांतच पूल कोसळला.’