अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च पद असलेले सरसंघचालक पदावर आजपर्यंत जेवढेही आले त्यांनी कधी संत तुकाराम महाराजांच्या कुठल्या तरी एका जयंतीला हजेरी लावली आहे का? असा सवाल करीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर टीकास्त्र सोडले. या आरोपातून मुक्त होण्यासाठी पुढच्या वर्षी सरसंघचालक हजेरी लावतीलही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित ओबीसी परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. परिषदेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले. ॲड. आंबेडकर म्हणाले, ”ओबीसी समाज विभागला आहे. अर्धा ओबीसी स्वत:च्या जगण्याच्या प्रश्नाला महत्त्व देत आहे. उर्वरित ओबीसी देवाच्या बाजूने उभा राहिला. आपण स्वत:लाच मानसन्मान द्यायला तयार नाही. हाच खरा लढा आहे. आपण एकमेकांचा सन्मान करणार नाही, तोपर्यंत यशस्वी होणार नाही.
हेही वाचा >>> वर्धा : शिक्षकांचा महसूल खात्यास सवाल; म्हणे, “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…”
आपलं ताट खाली आहे, समोरच्याचं भरलेले आहे. कुणाला त्यांच्या ताटातील मागितले तर ते देतील का? तर नाही. तुम्हीही देणार नाही. ताटातील जे आहे, ते सर्वांना समान वाटप होण्याची गरज आहे. त्यामुळे वाटण्याच्या त्या खुर्चीवर जाऊन आपण बसलं पाहिजे. राजकर्ते होण्याची मानसिकता आपण ठेवणे गरजेचे आहे. ही मानसिकता असेल तरच आपण सत्तेकरी होऊ शकतो आणि राज्य करू शकतो.” सत्ता हातात घेण्याची मानसिकता अर्धा ओबीसींची आहे, तर अर्ध्यांची नाही. जागृतीचा लढा सर्व ओबीसींपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज आहे. जोपर्यंत सर्वांपर्यंत लढा पोहोचणार नाही, तोपर्यंत हातात यश येणार नाही, असे देखील ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.