नागपूर: राज्यात लोकसभेच्या मैदानामध्ये महायुती व ‘मविआ’मध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी ‘मविआ’कडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीचा प्रस्ताव फेटाळत आपल्या उमेदवारांची घोषणा केली. यासंदर्भात सांगताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षात आताही एकोपा नाही. प्रत्येक पक्ष स्वतंत्र उमेदवार यादी जाहीर करत आहेत.
त्यांच्यामधील काही जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे अशांसोबत आम्ही पुन्हा जाऊन बिघाड घालणे योग्य नाही. परंतु, आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले. काँग्रेसने सातपैकी दोन जागांची नावे सांगितली त्यानुसार नागपूर आणि कोल्हापूरला आम्ही वंचितचा उमेदवार न देता पाठिंबा दिला.
हेही वाचा…विदर्भातील पाच जागांवर भाजपपुढे थेट लढतीचे आव्हान
अन्य पाच जागांवर माहिती काँग्रेसकडून आल्यावर त्याही सांगण्यात येतील असेही आंबेडकर म्हणाले. वंचित या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघ लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसला निवडणुकीत अंगावर घ्यावे लागेल. त्यांच्या दहा वर्षांच्या कामाच्या उणिवा जनतेला सांगाव्या लागतील. मात्र, ही ताकद ‘मविआ’च्या नेत्यांमध्ये नसून ती वंचितमध्ये आहे असेही आंबेडकर म्हणाले. रविवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली
४०० पार हा जुगारांचा आकडा
आम्ही निवडणूक लढतो. जनता ठरवेल की कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या. मात्र, जे लोक जुगार खेळतात ते आकड्यांची भाषा करतात. त्यामुळे ४०० पार हा जुगारांचा आकडा आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा…यवतमाळ : शिवजयंती उत्सवाच्या आयोजकावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा
‘मविआ’ला २७ उमेदवारांची यादी दिली होती
प्रस्थापितांविरोधात विस्थापित अशी ही निवडणूक होणार आहे. प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांना वंचित उमेदवारांना समोर येऊ द्यायचे नसल्यानेही ‘मविआ’सोबत जाता आले नाही असा आरोपही आंबेडकर यांनी केला. आघाडीची बोलणी सुरू असताना २७ जागांवरील उमेदवारांची यादी दिली होती. या जागांचा आम्ही अभ्यास केला होता. आता त्याला कुणी गांभीर्याने घेतले नाही असेही आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा…अमर काळे २ एप्रिललाच उमेदवारी अर्ज दाखल करणार; त्यांनी हाच दिवस का निवडला? वाचा…
अनेक मतदारसंघात भाजप विरुद्ध वंचित अशीच लढत
निवडणूक रोख्यांचा भ्रष्टाचार, हुकूमशहा मोदी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हे विषय घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. निवडणूक जशी जवळ येईल तशी भाजप आणि वंचित यांच्या उमेदवारातच लढत असल्याचे दिसून येईल असेही आंबेडकर म्हणाले. निवडणुकीवर राम मंदिराचा मुद्दा प्रभावी ठरणार नसून महागाई, बरोजगारी हे प्रमुख मुद्दे असल्याचेही आंबेडकर म्हणाले.