लोकसत्ता टीम
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून घालवयाचे आहे, केवळ एवढ्यासाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवेसनेच्या आघाडीत सहभागी व्हावे असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. किमान समान कार्यक्रम निश्चित झाल्याशिवाय आम्ही आघाडीत सामील होणे अशक्य आहे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
ते मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबेडकर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु, ही आघाडी अटी व शर्तीवर असणार आहे म्हणजेच किमान समान कार्यक्रमावर आधारित राहणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ३१ मुद्दे तयार केले असून त्यावर चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. एवढेच नव्हे त्यातील काही प्रमुख मुद्दे किमान समान कार्यक्रमात असले पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. असे झाल्यास आघाडी होईल आणि पुढील टप्प्यात जागावाटपाबाबत चर्चा होईल. अन्यथा आघाडी होणे अशक्य आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी अस्तित्वात नाही. इंडिया आघाडीचा संयोजक कोण, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला.
आणखी वाचा-“दीक्षाभूमीवर ५६ फूट उंच तथागत बुद्धाची मूर्ती,” भदंत सुरेई ससाई यांची माहिती
हिरे उद्योगाप्रमाणे कापसाला संरक्षण मिळावे
भारताची अर्थव्यवस्था कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यातून देशाला ३० टक्के विदेशी गंगाजळी मिळते. पण, त्याकडे सरकार फारसे लक्ष देत नाही. म्हणून आमची मागणी आहे, ज्याप्रकारे हिरे उद्योगांना केंद्र सरकार संरक्षण देते. त्याप्रमाणे कापसाला संरक्षण दिले पाहिजे.