अमरावती : लोकसभा निवडणुकीतील कामगिरीकडे पा‍हता मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘स्‍ट्राईक रेट’ हा माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यापेक्षा दुप्‍पट असून शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्‍या पक्षालाच खरी शिवसेना मानू लागले आहेत, असे स्‍पष्‍ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्‍यक्‍त केले आहे. काँग्रेसचे नेते कणाहीन असल्‍याचीही टीका त्‍यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आंबेडकर म्‍हणाले, काँग्रेसच्‍या नेत्‍यांना कणा नाही, त्‍यांना कणा असता, तर ते झुकले नसते.  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची तुलना केली, तर एकनाथ शिंदे यांची कामगिरी सरस आहे. याचा सरळसरळ अर्थ असा आहे, की जी शिवसेनेची मते आहेत, ती एकनाथ शिंदे यांच्‍याकडे राहिली आणि शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्‍या पक्षालाच खरी शिवसेना मानत आहे. उद्धव ठाकरे यांची कामगिरी ही आरक्षणवादी आणि मुस्‍लीम मतांमुळे वाढली आहे. हे दोन्‍ही वर्ग धर्मवादी पक्षांचे मतदार नाहीत. त्‍यामुळे काँग्रेसला कणा असता, तर ही वस्‍तुस्थिती त्‍यांनी महाविकास आघाडीच्‍या बैठकीत मांडली असती. पण, काँग्रेस पक्षातील कोणीही नेता हे मांडायला तयार नाही, अशी माझी माहिती असल्‍याचे प्रकाश आंबेडकर म्‍हणाले.

हेही वाचा >>>भाजपकडून वाझेंच्या ‘कुबड्या’ घेत आरोपांचे सत्र; अनिल देशमुख यांची टीका

राज्यात सध्या गरीब आणि श्रीमंत मराठा वाद सुरु आहे. श्रीमंत मराठ्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामधील पुढाऱ्यांना विकत घेतले आहे. सत्ता त्यांनी स्वत:कडे काबीज केली आहे. ही तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहे. राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे. ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे सुरू आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

  विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जात निहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षणावर स्‍थगिती दिली जाईल. असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणा, असे आवाहन करीत आहोत.

हेही वाचा >>>“माझ्याकडे गद्दारांची यादी, वेळ आल्यावर…” सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट; काँग्रेसमध्येही खळबळ

कुणबी ओबीसीमध्ये आहेत. ज्या कुणबी माणसाकडे कागदपत्रे आहेत, त्याला प्रमाणपत्र मिळणे हा त्याचा संविधानिक अधिकार आहे. मात्र तुम्ही घाई गडबडीत ५५ लाख कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले, त्‍याला आम्‍ही विरोध केला आहे. जात प्रमाणपत्र वाटणे, हे सरकारचे काम नाही. ज्‍यांनी तुमच्याकडे मागितलेच नाही. तरीही तुम्ही राजकारणासाठी ते देत आहात, ते थांबवा. ५५ लाख जात प्रमाणपत्र रद्द करा, अशी आमची मागणी असल्‍याचे आंबेडकर म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar opinion on shiv sainik eknath shinde group amravati mma 73 amy