अकोला : विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची चिन्हे नाहीत. निकालानंतर राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे. राज्यात प्रादेशिक पक्ष निर्णायक भूमिकेत राहणार आहेत, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना बाहेर ठेऊन देखील इतर पक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विधान देखील त्यांनी केले. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी विशेष संवाद साधला. विरोधकांचा खरपूस समाचार घेत निवडणुकीतील मुद्दे, निकालानंतरचे चित्र यावर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी किमान १०० जागा राष्ट्रवादीचे शरद पवार गट, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाकडे जातील. उर्वरित १८८ जागांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट व इतर पक्षांचा समावेश राहील. सरकार स्थापनेसाठी कुठल्याही एका पक्षाला बहुमता एवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना सत्तास्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांवर अवलंबून रहावे लागेल. भाजप व काँग्रेसला बाहेर ठेऊन इतर पक्षांनी एकत्रित येत महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याचा प्रयोग देखील होऊ शकतो. त्यामध्ये जुळवाजुळव करण्यात खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची असेल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा…नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना

लोकसभा निवडणुकीतील संविधान बदलण्याचा मुद्दा आता राहिलेला नाही. विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा सर्वात मोठा मुद्दा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने थांबवले आहे. २७ टक्के सरसकट आरक्षण देणे शक्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. स्वायत्त संस्थेमध्ये किती टक्के ओबीसी आहे, याची माहिती नसल्याने २७ टक्के आरक्षण देणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ओबीसी, मराठा भाजपपासून दुरावला

राज्यातील ओबीसी, मराठा मतदार भाजपपासून दुरावला. त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळे दलित मतपेढीला जवळ करण्याचे आता भाजपचे प्रयत्न दिसून येतात. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार नामोल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील दौऱ्यात करीत असतात, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. काँग्रेसने देखील केवळ मतांसाठी दलितांचा वापर करून घेतला. दलितांचे मतदान आमच्या सोबत आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा…गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,

लहान पक्षांसह अपक्षांची भूमिका महत्त्वाची

निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी, मनसे, तिसरी आघाडी यांच्या देखील जागा निवडूण येणार असल्याचे चित्र आहे. २१ जागांवर अपक्ष देखील आघाडीवर राहतील, असे चिन्ह आहेत. त्यामुळे लहान पक्ष, अपक्षांची भूमिका सरकार स्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, असे सुद्धा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.