Prakash Ambedkar on Mogambo Statement : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला होता. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
राजकारणात अशी टोपण नावं पडतातच. अशी नाव राजकारण्यांनी स्वीकारली पाहिजे, असं माझं वयक्तिक मत आहे. तरच राजकारणातला खेळतेपणा राहतो. नाहीतर याने मला मोगॅम्बो म्हटलं म्हणून त्याला गोळ्या घालायच्या असं व्हायला नको, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी शिंदे-ठाकरे वादात तुम्ही मध्यस्थी करणार का? असं विचारलं असता, याप्रकरणात मी़ मध्यस्थी करणार नाही. ज्याचं भांडण त्याने मिटवावं, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत बोलताना, विधानपरिषदेप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाचा पराभव होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस तेव्हा स्वत: सांगत होते की…”, २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल!
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, कोल्हापूरमधील कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ‘दुध का दुध पाणी का पाणी’ झालं. असे ते म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना, अमित शाहांचा मोगॅम्बो असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. “मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे, त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही”, असं ते म्हणाले होते.