वाशिम : स्वतंत्र विदर्भाची मागणी जुनी आहे. वेगळा विदर्भ व्हावा, यासाठी अणे, धोटे, शरद जोशींपासून लढा सुरु आहे. आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि भविष्यातही राहू, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितला निवडून आणा, वेगळा विदर्भ बनवू. भाजपा नेते वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नव्हतेच, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर दोन दिवसांच्या वाशिम दौऱ्यावर आहेत. आज वाशिम येथे वंचितच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अंजली आंबेडकर, अरुंधती शिरसाट, किरण गिऱ्हे, डॉ. सिद्धार्थ देवळे आदींची उपस्थिती होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वेगळा विदर्भ हा भाजपाचा कधीच अजेंडा नव्हता. आजही ते वेगळा विदर्भ करणार नाहीत. हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे जर भाजपाला वाटत असेल की वेगळा विदर्भ व्हावा, तर त्यांनी केंद्रात तसा ठराव घ्यावा. मी लहान राज्याच्या बाजूने आहे. लहान राज्यांचा विकास होतो, हे तेलंगणा व इतर राज्यांवरून दिसून येते. लहान राज्यांमध्ये सामान्य माणसाचं उत्पन्न वाढते.
भाजपापासून ओबीसी तुटला, शिंदे, जरांगे आता मराठ्यांचे मोठे नेते
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे यांच्यात जे सामंजस्य झाले, त्यानंतर ओबीसींमध्ये भाजपाविषयी नाराजी पसरली आहे. भाजपाने ओबीसींना फसविले. त्यामुळे भाजपापासून ओबीसी तुटले. भाजपाकडून आता जुळवाजुळव सुरु आहे. यामुळे दोन बळी गेले, एक म्हणजे भाजपा आणि दुसरा मराठा समाजातील सरंजाम पुढारी. त्यांनी भूमिका घेतली नाही. ते मागे पडून आजच्या घडीला मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे समाजाचे मोठे नेते म्हणून समोर आले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा – अमरावती-पुणे विशेष रेल्वे मार्चअखेरपर्यंत धावणार
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचितची भूमिका जाहीर करू
आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण आम्हाला नाही. मात्र चर्चेकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षांकडून बोलावणे आले आहे. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर व इतर नेते चर्चेसाठी बैठकीला गेलेले आहेत. त्यामध्ये काय चर्चा होते, त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.