अमरावती : वंचित बहुजन आघाडीने आमच्‍याकडे जागाच मागितल्‍या नाहीत, असे खोटे वक्‍तव्‍य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत करीत आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपावरून भांडणे सुरू आहेत. त्‍यांचे मतभेद मिटलेले नसताना ते एकत्र येणार का, मैत्रिपूर्ण लढत देणार का, याचा निकाल अजून महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी लावलेला नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप अडल्‍याची चर्चा चुकीची असल्‍याचे सांगितले. प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि शिवसेनेत लोकसभेच्‍या दहा जागांवरून मतभेद आहेत. या दहा जागांवर कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही दावा केला आहे. दुसरीकडे, पाच जागांवरून कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस यांच्‍यात अजून समझोता झालेला नाही. संजय राऊत हे माध्‍यमांशी खोटे बोलत आहेत. जेव्‍हा महाविकास आघाडीतील मतभेद संपुष्‍टात येतील, तेव्‍हाच वंचित बहुजन आघाडी चर्चा करू शकेल.

हेही वाचा – “चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार,” आघाडी, युतीच्या उमेदवारांना पक्षनेतृत्वाचे आश्वासन; संभ्रम वाढला !

प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, महाविकास आघाडीतील जागावाटपाचे भिजत घोंगडे असताना आपण स्‍वत: कॉंग्रेस पक्षाचे महाराष्‍ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्‍याशी दूरध्‍वनीवरून संपर्क साधला. जोपर्यंत महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील जागा वाटपावर मतैक्‍य होत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्‍यात जागावाटपाविषयी चर्चा सुरू करता येऊ शकेल, असा प्रस्‍ताव आपण दिला. पण, त्‍यावर पुढे काहीच हालचाली झाल्‍या नाहीत. त्‍यानंतर आपण स्‍वत: कॉंग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवले. त्‍यात कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्‍यात जागा वाटपाविषयी चर्चा व्‍हावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे, पण त्‍याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. आम्‍ही महाविकास आघाडीसोबत जाण्‍यास तयार आहोत, पण आधी त्‍यांच्‍यातील भांडणे मिटली पाहिजेत.

हेही वाचा – “आले अमित शहांच्या मना, तिथे कुणाचे चालेना,” वर्धेत थाटले स्वतंत्र निवडणूक कार्यालय

नवनीत राणा तुरुंगात जातील

अमरावतीच्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्‍याप्रकरणी न्‍यायालयात सुनावणी सुरू आहे. हा फसवणुकीचा गुन्‍हाच आहे. त्‍यांनी लवकरच तुरुंगात जाण्‍याची तयारी ठेवावी, असे प्रकाश आंबेडकर म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar reply to sanjay raut on seat allocation what did he say in akola mma 73 ssb
Show comments