अकोला : ‘मविआ’तील घटक पक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. काँग्रेस सक्षम नेतृत्वहीन असल्याने त्यांच्या पक्षात निर्णय क्षमता नाही. विधानसभा निवडणुकीत स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसचे विविध जिल्ह्यातील नेते विरोधकांशी ‘गुफ्तगू’ करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.
अकोल्यात रविवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या दोन आठवड्यांमध्ये ‘मविआ’तील घटक पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याचे व ते एकसाथ नसल्याचे आम्ही सांगत होतो. काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात रस्त्यावरील लढाईप्रमाणे भांडत आहेत. यासंदर्भात काँग्रेसला कळवले होते. मात्र, काँग्रेसमध्ये नेतृत्व नसल्याने ते कुठलाही निर्णय घेऊ शकले नाही.
हेही वाचा…भाजपच्या कार्यकर्त्यांनी वापरला ‘नामसाधर्म्य फॉर्म्युला’, पण माघारीमुळे महाविकास आघाडीला दिलासा
अजूनही ते निर्णय घेऊ शकत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसमधील जिल्हा नेतृत्वाला पक्ष व काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराविषयी आपुलकी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची गुफ्तगू करीत आहेत, असा गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व त्रस्त असल्याचे ते म्हणाले.
पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये रामटेक येथे किशोर गजभिये व शिवसेनेत लढत असून काँग्रेसचे अस्तित्व दिसून येत नाही. भंडारा-गोंदियामध्ये भाजप उमेदवारावर अनेक गावांनी बहिष्कार टाकला. त्या मतदारसंघात काँग्रेसचे काही नेते गोंदिया येथील भाजपमध्ये जाणारे माजी आमदार अग्रवाल यांच्यासोबत गुप्त बैठका करताना दिसून आल्याचा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. भंडारा-गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर मतदारसंघात मोठी ताकद म्हणून वंचित आघाडी समोर येत असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा…शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले “डॉक्टर नाही, पण काहींचे पट्टे सोडवले”
नाना पटोलेंची भूमिका म्हणजे ‘वराती मागून घोडे’
‘मविआ’ आणि वंचितमध्ये आघाडी करण्यावरून अद्यापही चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी आणखी जागा वाढवून देऊ, अशी साद घातली होती. त्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांची भूमिका म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका केली.