नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी विदर्भातील आदिवासी, ओबीसी, मुस्लीम समाजातील काही संघटनांच्या मदतीने विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात अधिकाधिक उमेदवार देण्याचा संकल्प केला आहे. या क्रमात आदिवासींसाठी गुरुवारी नागपुरात सभा आयोजित करण्यात आली होती. ते प्रमुख मार्गदर्शक होते, परंतु ऐनवेळी ते त्या सभेला न जाता दिवसभर विश्रामगृहात बसून होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांना निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता विधानसभा निवडणुकीत आंबडेकर यांनी ओबीसी आणि आदिवासीकडे मोर्चा वळवला आहे. त्यासाठी ते नागपुरात वारंवार येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दोन दिवस आधी नागपुरात आदिवासीसाठी जाहीर सभा आयोजित केली.

हेही वाचा – काँग्रेस मुलाखती ! अपेक्षित ते आलेच नाही, तर आलेल्यांची फिरकी

या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या पत्रिकेत गोंडवाना गणतंत्र पार्टी, भारत आदिवासी पार्टी, बिरसा ब्रिगेड, माना जमात समन्वय समिती, आदिवासी गोंड गोवारी (युवा शक्ती संस्था), हलबा, हलबी संघटना, कोलाम आदिवासी समाज संघटना, माडिया, कोरकू, भिल्ल, परधान आदी आदिवासी संघटना सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या सभेला आदिवासी आरक्षण बचाव सत्ता संपादन परिषद असे नाव देण्यात आले होते तर प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर होते. ते शनिवारी सकाळी नागपुरात दाखलही झाले. त्यांची थांबण्याची व्यवस्था राविभवन या शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती.

उत्तर नागपुरातील बेझनबाग मैदानावर दुपारी ३ वाजता ही सभा होणार होती. परंतु या आदिवासींच्या सभेला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अपेक्षित गर्दी न जमल्याने आंबेडकर सभेकडे फिरकले नाहीत. सभेला केवळ शंभर ते दीडशे लोक आले होते. अत्यल्प गर्दी असल्याचे समजल्यावर आंबेडकर यांनी राविभवनमधील आपल्या खोलीत राहणे पसंत केले. ते दिवसभर विश्रामगृहातून बाहेर पडले नाही. अपेक्षित गर्दी न जमल्याने आंबेडकरांनी सभेला जाण्याचे टाळले, अशी माहिती आहे.

हेही वाचा – बहुचर्चित गायवाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई नाहीच; लाभार्थी, कर्मचाऱ्यांचे पुन्हा जबाब…

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ओबीसी आणि इतर काही संघटनांशी चर्चेत दिवसभर व्यस्त होते. शिवाय पाऊस आला. त्यामुळे ते सभेला जाऊ शकले नाहीत. – रवी शेंडे, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar stayed in the rest house for the whole day what exactly happened in nagpur rbt 74 ssb