अकोला : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह दिले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढले होते. आता विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचे सर्व उमेदवार ‘गॅस सिलिंडर’ या एकाच चिन्हावर निवडणूक लढू शकतील. निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी अधिकृत चिन्ह दिल्यामुळे वंचित आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी वंचित आघाडीने सुरू केली. पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये बोलणी यशस्वी झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष न होता वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवली. वंचित आघाडीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये पक्षाचा जनाधार घटल्याचे वंचितला मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना तिरंगी लढतीमध्ये अकोल्यात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’, तर इतर उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह मिळाले होते.अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढताना ॲड. प्रकाश आंबेडकर ‘गॅस सिलिंडर’ चिन्हासाठी आग्रही होते. अकोल्यातून ॲड. आंबेडकरांनी लोकसभेच्या ११ निवडणुका लढवल्या आहेत. यापूर्वी त्यांना उगवता सूर्य, बंगला, कपबशी आदी चिन्हे मिळाली होती. ‘सिलिंडर’ चिन्हासाठी ॲड. आंबेडकर यांनी प्रतिनिधींमार्फत अगोदरच अर्ज देखील केला होता. मात्र, दोन उमेदवारांनी त्याच चिन्हावर दावा केल्याने ईश्वरचिठ्ठी काढावी लागली. त्यात आंबेडकरांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह देण्यात आले होते.

हेही वाचा : नागपूर विद्यापीठाच्या दोन गटातील वाद आणि ३० कोटींच्या वसुलीच्या आरोपाचा काय संबंध आहे?

लोकसभा निवडणुकीत ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह न मिळाल्याचे शल्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात कायम होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ‘गॅस सिलिंडर’ या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक आयोगाने वंचितची मागणी मान्य केली आहे. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना आता ‘गॅस सिलिंडर’ हे चिन्ह मिळेल. पसंतीचे चिन्ह मिळाल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे वंचित आघाडीने स्वागत केले आहे.