अमरावती : वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून काँग्रेसने वंचित आघाडीला दूर ठेवले आहे. वंचितला सोबत न घेतल्यास तुमची सत्ता येणार नाही आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून इतर अनेक काँग्रेस नेते तुरुंगात दिसतील, असा सूचक इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे जाहीर सभेत बोलताना दिला. महाविकास आघाडीसोबत युती झाली नाही, तर वंचित आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबतच काँग्रेसवरही जोरदार शरसंधान केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे उलटली, तरी तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचे धोरण ठरले नाही. महाविकास आघाडीला खरेच मोदी यांना पराभूत करायचे आहे का, असा प्रश्न पडतो. काँग्रेसने वंचित आघाडीला लोकसभेच्या दोन जागा देण्याची तयारी दाखवली आहे, पण त्या जागा कोणत्या हेही सांगण्यास ते तयार नाहीत. काँग्रेसला युती तोडण्यासाठी कुणीतरी बळीचा बकरा हवा आहे आणि तो होण्याची आमची इच्छा नाही.

हेही वाचा >>>नागपूर: वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच गवसला…

अन्यथा तुम्हालाही गाडल्याशिवाय राहणार नाही

महाविकास आघाडीने आधी त्यांच्यात जागावाटप करावे, नंतर आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत बोलू. आपण एकत्र लढलो तर तुमच्या मानेवरची तलवार हटेल. मात्र, सर्व जण मोदी यांना घाबरून आहेत. वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरीही खाणार, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली नाही, तर यांचे सत्तेवर येण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही आणि हे सर्व जण तुरुंगात दिसतील. आम्हाला सोबत घेतले तर ठिक, अन्यथा भाजपसह आम्ही तुम्हालाही गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला.

शरद पवार माध्यमांशी बोलून कुणाला फसवित आहेत

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेणार, असे वक्तव्य पवारांनी केले, पण प्रसार माध्यमांशी बोलून ते कुणाला फसवित आहेत. हीच चर्चा त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याशी करावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

हेही वाचा >>>राम मंदिर उद्घाटनदिनी फडणवीसांच्या निवासस्थानी ‘राम नाम जप’ आंदोलन…

मोदी काँग्रेसला खिंडीत गाठतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मदारी आहेत. सध्या ते डमरू वाजवत आहेत आणि सर्व जण त्यांच्या तालावर नाचत आहेत. काँग्रेसने भारत जोडोची दुसरी यात्रा काढली. पण, नरेंद्र मोदी लगेच निवडणुका घोषित करून त्यांना खिंडीत गाठतील, असे भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले. वंचितची सत्ता आल्यास कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी आणि कापसाला पाचशे रुपये क्विंटल बोनस देण्याची जुनी व्यवस्था पुन्हा आणण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर आदी उपस्थित होते.

खासदार नवनीत राणांची जागा तुरूंगात”

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यांना अमरावतीतून मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. बनावट प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी त्यांची जागा तुरूंगात आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना केली. नीलेश विश्वकर्मा म्हणाले, नवनीत राणा यांनी येथील मतदारांचा विश्वासघात केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आदेश आला तर अमरावतीच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी झालेला दिसेल, असे विश्वकर्मा म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar warns that congress leaders will go to jail if they dont take vanchit with them amravati mma 73 amy