चंद्रपूर : जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रेय आणि पदमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यात ‘पत्रचोरी’वरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश प्रभारी एच.के. पाटील यांना लिहिलेले गोपनीय पत्र देवतळे यांनी चोरल्याचा आरोप दत्तात्रेय यांनी केला आहे. तर, माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच दत्तात्रेय व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते पत्र माध्यमात सार्वत्रिक केल्याचा आरोप देवतळे यांनी केला आहे.
हेही वाचा – खुशखबर! तुमच्या वस्तीतील स्वस्त धान्य दुकानांमधून लवकरच बँक सेवाही
काँग्रेस जिल्हाध्यक्ष आपणच असल्याचा देवतळे यांचा दावा दत्तात्रेय यांनी पत्रपरिषदेत खोडून काढला. चोरलेल्या पत्राच्या आधारावर गेल्या दोन दिवसांपासून देवतळे जिल्हाध्यक्षपदावर दावा करत असल्याचे दत्तात्रेय यांनी सांगितले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने पत्रचोरीचा हा प्रकार गांभीर्याने घेतला असून लवकरच देवतळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षातून कायमची हकालपट्टी केली जाईल, असे दत्तात्रेय यांनी सांगितले. दुसरीकडे, देवतळे यांनी दत्तात्रेय यांचे आरोप खोडून काढले आहेत. दत्तात्रेय यांनीच हे पत्र माध्यमात सार्वत्रिक केल्याचा आरोप देवतळे यांनी केला आहे.
पत्रचोरीचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे देवतळे म्हणाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी दत्तात्रेय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवणार आहे. पक्षश्रेष्ठींनी माझीच जिल्हाध्यक्षदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याशीच समितीकडून पत्रव्यवहार केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.