नागपूर: प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचा निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. त्याचे आणि विदर्भाचे वेगळेच नाते होते. प्राचार्य राम शेवाळकर आणि बाबा महाराज सातारकर यांच्यात स्नेह होता. त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आली. नागपूरला आले की शेवाळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन तासनतास ज्ञानेश्वरीवर गप्पा मारत होते. त्यांच्या निधनामुळे विदर्भातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रकाश एदलाबादकर यांनी बाबांच्या आठवणी सांगत असताना म्हणाले, बाबा महाराज सातारकर पहिल्यांदा नागपुरात १९९१ मध्ये आले होते. त्यावेळी केशवनगर सांस्कृतिक सभेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त पाच दिवसीय कीर्तन महोत्सव रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आली होता. पाचही दिवस बाबा महाराजांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी रेशीमबागेत सीताराम महाराज यांच्याकडे त्यांचा मुक्काम होता. बाबांनी घरी यावे असा अनेकांचा आग्रह होता. वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला महत्त्व आहे . त्यामुळे माळ घालाल तर घरी येतो असे ते सांगत. माळ घातल्यानंतर कुठलेही व्यसन करायचे नाही असा त्यांचा आग्रह होता. यातून नागपुरातील अनेक तरुण वारकरी संप्रदायाशी जुळले.
हेही वाचा… २८ ऑक्टोबरला दिसणार वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण
राम शेवाळकर यांचे चिरंजीव आशुतोष शेवाळकर म्हणाले, बाबांचे आणि बाबा महाराज सातारकर यांचे एक वेगळेच नाते होते. ज्ञानेश्वरी हा दोघांचा आवडीचा विषय होता.त्यामुळे ते घरी आले की तासनतास ज्ञानेश्वरीवर बोलत असत. नागपूरला त्यांच्या कीर्तनाला बाबा जात होते. अचलपूर आणि वणीला सुद्धा बाबा महाराजांची कीर्तन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अचलपूरला आमच्या निवासस्थानी थांबले होते. बाबा महाराज सातारकर यांच्या ऐश्वर्ती ज्ञानेश्वरीचे पंढरपूरला राम शेवाळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.