‘व्हिएनआयटी’तील तासाभराच्या वर्गाने शिक्षक ओशाळल्यागत
केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकरांना ऐकण्यासाठी आलेल्या सभागृहातील सर्व ‘गुरुजीं’ना जावडेकरांनीच कानपिचक्या दिल्याने काही क्षण या गुरुजींनाही ओशाळल्यागत झाले. विद्यार्थी तयार होत आहेत, पण शिक्षक तयार होत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अलीकडचा शिक्षक कसा आहे, इथपासून तर शिक्षकांनी कसे असले पाहिजे इथपर्यंत तब्बल तासभर जावडेकरांचा वर्ग चालला.
‘व्हीएनआयटी’त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतील एक तासाच्या व्याख्यानात तब्बल अर्धा तास सभागृहात उपस्थित शिक्षकांवर प्रकाश जावडेकर यांनी लक्ष्य केंद्रित केले होते. शिक्षकांच्या ज्ञानावर शंका नाही, पण केवळ ज्ञान असून उपयोग नाही. शिक्षकांच्या डोळयात स्वप्न दिसायला हवे. त्यांच्या डोळयातील स्वप्न इतरांच्या डोळयात संक्रमित करण्याची ताकद शिक्षकांमध्ये दिसली पाहिजे. विकासाच्या दिशेने वाटचाल करताना विकासाचा दरवाजा उघडण्यासाठी चावी हवी आणि ही चावी म्हणजेच आहे. ती चावी शिक्षकाला नीट हाताळता आली तरच चांगले विद्यार्थी घडवता येतील आणि विकासाची दारे खुली होतील. शिक्षक चांगले नाहीत असे नाही, पण चांगल्या असणाऱ्या शिक्षकांची संख्या फार थोडी आहे. खरे तर चांगल्या असणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढवणे हे शिक्षकांच्याच हातात आहे. शिक्षणाकडे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून पाहिले जाते आणि त्याच पद्धतीने ते दिले जाते. कदाचित यामुळेच विद्यार्थीसुद्धा आवडले काय आणि नाही आवडले काय, शिक्षण फक्त ग्रहण करायचे म्हणून करतो. अशावेळी शिक्षणाला केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम न बनवता त्यात अशा काही गोष्टी शिक्षकाला अंतर्भूत करता यायला हव्या, ज्यामुळे विद्यार्थी त्याकडे ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून न पाहता शिक्षणात रस घेईल. यामुळे त्याला भविष्याची दिशा निश्चित करता येईल. शिक्षक कसा असला पाहिजे यावर प्रकाश जावडेकर यांनी चक्क शिक्षकांचा पाठ घेतला. शिक्षकी पेशा आहे म्हणून शिकवायचे असे नाही तर फक्त शिक्षक म्हणूनच नव्हे, तर चांगला माणूस म्हणूनही त्यांना स्वत:ची प्रतिमा घडवता आली पाहिजे. माझा विद्यार्थी मी घडवणार आणि मी घडवलेल्या विद्यार्थ्यांचा मला अभिमान वाटणार, अशी अपेक्षा असणारे शिक्षक असले पाहिजेत. अलीकडे ही वृत्ती फार मोजक्या शिक्षकांमध्ये दिसून येते. शिक्षण सर्वस्पर्शी असले पाहिजे आणि ते सर्वस्पर्शी बनविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. तब्बल तासाभरानंतर जावडेकरांचा वर्ग संपला आणि सभागृहात उपस्थित शिक्षकांनी सुटकेचा श्वास सोडला.