आज रवाना होणार; ‘कठोर आव्हानावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मात करणार’
जगातली सर्वोच्च सात शिखरे सर करणे ही त्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी तो प्रयत्नशीलसुद्धा, पण तरीही गिर्यारोहणापेक्षा ट्रेकिंग त्याच्या अधिक जवळचे आणि आवडीचे आहे. शिखर कोणतेही असो ते सर करण्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्यातही शिखरावर पोहोचेपर्यंतचा प्रवास अधिक आव्हानात्मक असतो. अलीकडेच म्हणजे गेल्या एक ऑगस्टला त्याने रशियातील ‘माउंट एल्ब्रस’ हे १८ हजार ५१० फूट उंचीचे शिखर सर केले. आता पुन्हा एकदा तो शिखर सर करण्यासाठी निघाला आहे. मात्र, यावेळी जगातल्या सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’ला त्याने गवसणी घालण्याचे ठरवले आहे.
नागपूरचा युवा पर्वतारोहक प्रणव बांडेबुचे जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’(८८४८ मीटर) सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या, शनिवारी तो या साहसी मोहिमेसाठी रवाना होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रणव शिखर सर करण्यासाठी प्रयत्न करत होता, पण वाईट हवामानामुळे भारतातल्या एका मोहिमेवरुन त्याला परतावे लागले. आकाश जिंदाल या त्याच्या मित्रामुळे त्याला संधी मिळाली आणि रशियातील ‘माउंट एल्ब्रस’ शिखर मोहिमेकरिता जाणाऱ्या पहिल्या भारतीय चमूत त्याला प्रवेश मिळाला. त्याच्या आयुष्यातील पहिल्या विमान प्रवासाची सुरुवात आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाने या मोहिमेच्या निमित्ताने झाली. २५ जुलै २०१५ला रात्री ३ वाजता त्याची मोहीम खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि एक ऑगस्टला त्याने १८ हजार ५१० फूट उंचीचे ‘माउंट एल्ब्रस’ हे शिखर सर केले.
या यशस्वी मोहिमेनंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याने जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’ सर करण्यासाठी तयारी सुरू केली. गेल्या काही महिन्यापासून तो शारीरिक व मानसिक पातळीवर या मोहिमेसाठी तयारी करत आहे. सीएसी ऑलराउंडर या साहसी संस्थेच्या साहसी बचाव पथकाचा तो सदस्य असून एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यासाठी २६ वष्रे वयोगटातील तो पहिला वैदर्भीय ठरला आहे. आजपर्यंत नागपूरमधून कुणीही ‘माउंट एव्हरेस्ट’ सर केलेले नाही. सीएसी ऑलराउंडरसोबत अनेक हिमालयीन शिबिरांदरम्यान जगभरातील उत्तुंग शिखर गाठण्याची आवड निर्माण झाल्याचे प्रणवने सांगितले.
उमरेड-कुही परिसरातील या शेतकरी पुत्राने एक पर्वतारोही म्हणून देशविदेशातली अनेक उंच शिखरांना गवसणी घातली आहे. प्रणवच्या या मोहिमेने परिसरातील युवकांचा आत्मविश्वास वाढून ते या साहसी उपक्रमाकडे आकर्षित होतील. त्यामुळे साहसी क्रीडा व साहसी पर्यटन, साहसी शिक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा सीएसी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते व संपूर्ण चमूने व्यक्त केली आहे. तसेच प्रणवच्या या मोहिमेसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
सीएसी ऑलराउंडरसोबत २००७ मध्ये हिमालयीन शिबिरातील सहभागाने प्रणवच्या साहसी वाटचालीतील पहिले पाऊल टाकले गेले. त्यानंतर पर्वतारोहणचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी मनाली येथील ‘अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स’ मधून बेसिक माउन्टेनिअरिंग कोर्स २००९ मध्ये व अॅडव्हान्स कोर्स २०१० मध्ये अ श्रेणीत पूर्ण केला आहे. हनुमान तिब्बा हे ढाउलधर रेंजमधील सर्वात उंच शिखर त्याने सर केले. एमटी देव तिब्बा (६,००१एमटीआर), एमटी शीतीधर (५२९०एमटीआर) या शिखरांनासुद्धा त्याने गवसणी घातली. याशिवाय २०० किमी आणि ३०० किमीच्या सायकलिंग मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
साहसी मोहीम ५४ दिवसांची!
प्रणवची माउंट एव्हरेस्ट साहसी मोहीम ५४ दिवसांची असून नागपूर ते दिल्ली, दिल्ली ते काठमांडू येथे कागदपत्रांची पूर्तता करून लुकला येथे प्रयाण आणि तेथून नामचे बाजार ३४४६ मीटर व तेथून एव्हरेस्ट बेस कॅम्प खुंबू आईस फॉल ५३७० मीटर येथून पहिला कॅम्प ५९०० मीटर, दुसरा कॅम्प ६२०० मीटर, तिसरा कॅम्प ७३०० मीटर, साऊथ कोल ७९२५ मीटर, समिट ८८४८ मीटर असा मोहिमेचा कार्यक्रम आहे. काठमांडूहून त्याचा प्रवास ४ एप्रिलपासून सुरू होत असून ३० मेपर्यंत त्याची मोहीम पूर्ण होण्याची शक्यता आहे.