नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून जेम्स लेण्याच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या आवाजातील कथित ध्वनिफितीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. प्रशांत कोरटकर हे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या जवळचे असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे समाज माध्यमावर त्यांचे अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत छायाचित्रे असतात.त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना कुठल्या मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आहे अशी चर्चा राज्यात सुरू आहे.संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी प्रशांत कोरटकर यांच्या कथित ध्वनिफितीमधील वक्तव्याविरोधात निवेदन दिले आहे.
सायंकाळी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रशांत कोरटकर याच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल किंवा त्याची धिंड काढेल त्याला आम्ही १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देणार अशी जाहीर घोषणा संभाजी ब्रिगेडच्या वतीने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विरोधात शिवप्रेमी फुकट मारायला तयार होत आहेत. महिलांनी सुद्धा पुढे मागे करू नये, महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला प्रशांत कोरटकर याला बांगड्या घालतील, त्या महिलांचा जाहीर सत्कार करू. त्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर करण्यात आले. परंतु प्रशांत कोरटकर यांना कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेमके प्रकरण काय
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतंच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली आहे. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असं म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीत मधून दिसून येते. अशाप्रकारे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांना कुठल्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
प्रशांत कोरटकर यांनी आरोप फेटाळले
इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत नाही, त्यांना कधीच फोनवर संपर्क ही साधलेला नाही, त्यामुळे इंद्रजीत सावंत यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिले आहे.फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे. त्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजही माझा नाही, असा दावाही प्रशांत कोरटकर यांनी केला आहे.