नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोरटकर याला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक ध्वनिफीत फेसबुकवर सामायिक केली आहे. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिल्याचा आरोप आहे.

तसेच राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीतमध्ये ऐकू येत आहे. या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वातील पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळपर्यंत नागपुरात पोहचणार आहे. हे पथक बेलतरोडी पोलीस ठाण्यात जाणार असून बेलतरोडी पोलिसांची मदत घेऊन प्रशांत कोरटकर याच्या घरी जाणार आहे. कोरटकर याला ताब्यात घेऊन कोल्हापूरला आजच नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. प्रशांत कोरटकर याने मात्र ‘धमकी देण्यासाठी ‘एआय’चा वापर करुन माझी बदनामी केली’असा दावा केला आहे.

कोरटकर पसार?

राज्य पोलीस दलातील जवळपास प्रत्येक आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकणाऱ्या कोरटकर याच्यावर कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मंगळवार दुपारपासूनच तो घरी नाही. अटक होण्याची शक्यता असल्यामुळे कोरटकर हा घरी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या घराला बेलतरोडी पोलिसांनी सुरक्षा दिली आहे, हे विशेष.