नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकर हा आज मंगळवारी मुंबईत दाखल झाला आहे. तो आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता असून जर कोरटकरचा न्यायालयाने जामीन नाकारल्यास आज त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकरचा जामीन अर्ज रद्द व्हावा, अशा मागणीचा अर्ज गेल्या गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होणार आहे.इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच कोरटकरने जनतेची माफी मागण्याऐवजी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. त्यानंतर तो नागपूर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक नागपुरात आले होते. मात्र, काही पोलिसांच्याच मदतीने तो कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपून बसल्याची चर्चा होती. शेवटी कोल्हापूर पोलिसांनी रिकाम्या हाताने परतावे लागले. दुसऱ्याच दिवशी कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर हिने बेलतरोडी पोलीस ठाण्यात ‘जीवाला धोका आहे” अशी तक्रार दिली. तिसऱ्या दिवशी फरार असलेल्या कोरटकरचा मोबाईल आणि सीमकार्ड घेऊन पत्नी पल्लवी सायबर पोलीस ठाण्यात पोहचली. या सर्व घडामोडीमुळे गृहमंत्रालयाचा आशिर्वाद कोरटकरवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने ११ मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी त्याचा जामीन रद्द व्हावा, अशा मागणीचा अर्ज सरकारी वकिलामार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गुरुवारी दुपारी उच्च न्यायालयात कोल्हापूर पोलिसांनी अर्ज दाखल केला असून अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

कोरटकर मंगळवारी सकाळीच मुंबईत दाखल झाला असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत हजर होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोरटकरच्या अटकेबाबत पोलीस वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करणार आहेत. मात्र, आज कोरटकरला अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Story img Loader