चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर एका सट्टा व्यावसायिकाच्या आशीर्वादाने पोलीस मुख्यालयासमोरील एका हॉटेलात मुक्कामी होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘चिल्लर माणूस’ पण अद्यापही अटक नाही
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर चर्चेत आलेला प्रशांत कोरटकर हा चार ते पाच दिवस चंद्रपुरात मुक्कामी होता, असे बोलले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होऊ लागल्यानंतर तो २५ फेब्रुवारीला नागपुरातून पसार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रशांत कोरटकरचा उल्लेख ‘चिल्लर माणूस’ असा केला. मात्र हा ‘चिल्लर माणूस’ अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. मंगळवारी कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस त्याच्या मागावर आहे. मात्र, दरम्यानच्या काळात अंतरिम जामीन मंजूर असताना कोरटकर आपली बाजू मांडायला आणि आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे हजर झाला नाही.
मैत्रीपूर्ण संबंधांमुळे वाचवण्याचे प्रयत्न?
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गरळ ओकल्यानंतर प्रशांत कोरटकर प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. प्रशांत कोरटकरचे समाज माध्यमांवरील छायाचित्रे बघितले असता त्याचे भाजपच्या नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण सबंध असल्याचे दिसते. त्याचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मैत्रीपूर्ण सबंध आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. अशातच आता तो चंद्रपुरात येवून गेल्याची माहिती आहे.
‘बुकीं’ची ‘सेटिंग’!
येथील पोलीस मुख्यालयासमोरील एका हॅाटेलात प्रशांत कोरटकर मुक्कामी होता. चंद्रपुरातील एका सट्टा व्यावसायिकाने त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती. इतर दोन छोटे ‘बुकी’ही कोरटकरच्या दिमतीला होते. याच ‘बुकीं’ची पोलिसांसोबतची ‘सेटिंग’ कोरटकर यानेच लावून दिली होती, अशीही चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोरटकर याला चंद्रपूर पोलीस दलातील एक अधिकारीही भेटून गेल्याचे बोलले जात आहे. कोरटकर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम करीत होता, असाही आरोप आहे. या अधिकाऱ्यानेही मोक्याच्या पोलीस ठाण्यात आपली वर्णी लागावी, यासाठी त्याची भेट घेतल्याचे समजते. या हॉटेल मालकाचे सर्वपक्षीय नेत्यांशी व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे सुरक्षित ठिकाण म्हणून या हॉटेलची त्याने निवड केल्याचे बोलले जात आहे.
तेव्हा रेल्वेने यायचा आता महागड्या गाड्यांमध्ये…
सन १९९९ ते २००३ या कालावधीत प्रशांत कोरटकर दीडशे रुपये प्रमाणे तासिक तत्त्वावर स्थानिक सरदार पटेल महाविद्यालायातील जनसंवाद विभागात विद्यार्थ्यांना शिकवायाचा. यातूनच त्याने लपण्यासाठी चंद्रपूरचा आधार घेतल्याची चर्चा आहे. तेव्हा तो हिंगणघाट येथून रेल्वेने यायचा. मात्र, आता तो कोट्यवधींच्या महागड्या वाहनात फिरतो.