नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करणारा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याचे एक-एक कारनामे समोर येत आहे. पीएचडी केल्याचा आव आणत स्वत:ला डॉक्टर संबोधणारा प्रशांत कोरटकर याची डॉक्टरेट पदवीसुद्धा बोगस असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्याने एका खाजगी विद्यापीठाकडून खूप परीश्रम (?) घेऊन मानद ‘डॉक्टरेट’ मिळविली असून त्या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नाही. अशा स्थितीत नियमानुसार कोरटकर हा कुठल्याही दृष्टीने स्वत:ला डॉक्टर असल्याचे संबोधू शकत नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून तो डॉक्टरेट अशी बिरुदावली मिरवत फिरत असल्याची चर्चा सुरु आहे.

मार्च २०२० मध्ये कथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर तो नावासमोर डॉक्टर लिहून मिरवायला लागला. त्याचे व्हिजिटिंग कार्ड, फेसबुक, इंस्टाग्राम त्याचप्रमाणे पत्रव्यवहारातदेखील तो ‘डॉ.’ असे नावासमोर लिहू लागला. आरोपी कोरटकर याचे अनेक कारणाने समोर आल्यामुळे त्याच्या डॉक्टरेट या पदवीबद्दल अनेकांना उत्सूकता होती.

कारण, डॉक्टर असल्याचे सांगून तो अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून मिरवायचा. विद्यापीठातील अनेक प्राध्यपकांच्या शेजारी तो बसून उच्चविद्याविभूषित असल्याचा आव आणायचा. मात्र, त्याच्या डॉक्टरेट पदवीबाबत चाचपणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी कोरटकरने भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळविली आहे. संबंधित विद्यापीठातून ही डॉक्टरेट मिळविण्याचे कुठलेही अधिकृत मापदंड नाहीत. यासाठी कुठलीही पात्रता परीक्षा होत नाही किंवा कुठलेही संशोधन तसेच संबंधित क्षेत्रात अत्युच्च दर्जाचे कामदेखील अपेक्षित नसते. एकीकडे पीएचडी मिळविण्यासाठी उमेदवार दिवसरात्र एक करून अभ्यास व संशोधन करतात. मात्र, दुसरीकडे कोरटकरसारख्या प्रवृत्ती अर्थपूर्ण व्यवहार आणि राजकीय नेत्यांचा दबाव आणून डॉक्टरेटचा मान विकत घेऊन स्वत:ला उच्चविद्याविभूषित म्हणवत सरकारी यंत्रणेतच वावरतात हा विरोधाभास दिसून येत आहे. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरकडून स्वत:ला उच्चविद्याविभूषित दाखविण्याचा हा प्रयत्न असून राज्याचे शिक्षणमंत्री व शासकीय यंत्रणा याची दखल घेईल का असा सवाल उपस्थित होत आहे. आरोपी कोरटकरचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने अर्थपूर्ण संबंध जोपासून डॉक्टरेट मिळविल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

‘आयपीएस’ दर्जाचे अधिकारी सतर्क

गृहमंत्रालयात नेहमी वावर असणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकर हा नेहमी आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गर्दीत मिरवायचा. त्यांच्यासोबत फोटो काढून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन देण्यासाठी गृहमंत्रालयापर्यंत पैशांची बॅग पोहचविण्यासाठी कोरटकरसारख्या प्रवृत्तीचा वापर होतो आणि कोरटकर सारख्या व्यक्तींंमुळे अनेक प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा आहे. कोरटकरच्या प्रतापामुळे आता काही ‘आयपीएस’ अधिकारी सतर्क झाले असून काहींनी स्वत:च्या फेसबुकवरुन कोरटकरसोबत काढलेले फोटो डिलीट केल्याची माहिती समोर येत आहे.

Story img Loader