नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याची पत्नी पल्लवी यांनी सायबर पोलीस ठाण्यात पतीचा भ्रमणध्वनी आणि सीमकार्ड पोलिसांच्या स्वाधीन केले.

नागपूर पोलिसांचे एक पथक मंगळवारी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. फरार असलेला कोरटकर हा पोलिसांच्या हाती लागत नाही, मात्र, त्याचा भ्रमणध्वनी पोलीस ठाण्यात आणून दिल्या जातो, यावरुन नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. कोरटकर हा नागपुरातच लपून बसल्याची चर्चा असून पोलीस मुद्दामुन त्याला ताब्यात घेत नसल्याची चर्चा आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे.

तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या मोबाईलवरुन धमकी देण्यात आली किंवा ज्या मोबाईल क्रमांकावरुन धमकी देण्यात आली, तो मोबाईल आणि सीमकार्ड पोलिसांना जप्त करायचे होते.

पोलिसांनी कोरटकरचा मोबाईल आणि सीमकार्डची जप्त करण्याची माहिती प्रसारमाध्यमांना देताच दुसऱ्याच दिवशी आरोपी प्रशांतची पत्नी पल्लवी कोरटकर हिने सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात पोहचून मोबाईल आणि सीमकार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी रितसर पंचनामा करुन कोरटकरचा मोबाईल आणि सीमकार्ड जप्त केले.

आरोपी प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी यांनी प्रशांतने वापरलेला मोबाईल आणि सीमकार्ड सायबर पोलीस ठाण्यात आणून दिले. पोलिसांनी पंचनामा करुन जप्तीची कारवाई केली. आता कोरटकरचे मोबाईल आणि सीमकार्ड हे कोल्हापूर पोलिसांना सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक मंगळवारी कोल्हापूरला रवाना होणार आहे. – लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, साबयर क्राईम विभाग

Story img Loader