नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरची पत्नी पल्लवी हिच्याकडून पासपोर्ट जप्त केला. त्यामुळे कोरटकर हा दुबईत पळून गेल्याच्या अफवेला पूर्णविराम मिळाला.
आरोपी प्रशांत कोरटकर हा एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने गेल्या दोन वर्षांपूर्वी कुटुंबीयांसह दुबईला गेला होता. त्यावेळी काढलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले होते. तेच छायाचित्र गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. त्यामुळे कोरटकर हा दुबईला पळाल्याची अफवा उडाली होती. त्यामुळे नागपुरात कोरटकरला अटक करण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या पथकाने पल्लवी हिच्याकडून कोरटकरचा पासपोर्ट जप्त केला.
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलीस त्याच्या शोधात आहेत. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. इंद्रजीत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांची भेट घेऊन कोरटकरचा पासपोर्ट जमा करून घेण्यासाठी त्याच्या पत्नीला नोटीस पाठवण्याची विनंती केली. दरम्यान, त्याच्या पत्नीने तपासासाठी नागपुरात असलेल्या कोल्हापूर पोलिसांकडे कोरटकर याचा पासपोर्ट देऊन अफवा आणि चर्चांना पूर्णविराम दिला.
‘कोरटकरचा शोध घेऊन कारवाई करू’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरटकरच्या पसार होण्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर कोरटकर कुठेही गेला तरी पोलीस त्याला पकडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र, कोरटकर हा पोलिसांच्याच मदतीने लपून बसल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हापूरचे पथक कोरटकरचा शोध घेण्यासाठी चंद्रपुरात गेले आहे.
लूक आऊट नोटीस
प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तो विदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रशांत कोरटकरबाबत लूक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता प्रशांत कोरटकर हा विदेशात पळून जाण्याची शक्यता मावळली आहे.