नागपूर : कोल्हापूर आणि नागपुरात दाखल गुन्ह्यातून सध्या फरार असलेला तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या पत्नीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. धमक्या येत असून कुटुंबीयांना काही झाल्यास इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत जबाबदार असतील, अशी भूमिका त्यांनी पोलिसांसमोर मांडली.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप असलेल्या कोरटकर याच्याविरुद्ध कोल्हापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला.

आता नागपूर पोलिसांनीही गुन्हा दाखल केल्यामुळे कोरटकरच्या अडचणींत वाढ झाली आहे. कोरटकर सध्या फरार असून त्याच्या घराला बेलतरोडी पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. कोरटकरविरुद्ध कारवाईचा फास आवळत असल्यामुळे कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर या शनिवारी दुपारी बारा वाजता बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्यांनी बेलतरोडी पोलिसांमध्ये लेखी तक्रार देत असल्याचे सांगितले. त्यानंतर बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना पल्लवी कोरटकर यांची तक्रार घेण्याचे आदेश दिले.

कुटुंबीयांना अज्ञातांकडून धमक्या येत असून आमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे काही झाल्यास इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत जबाबदार असतील, अशी तक्रार त्यांनी बेलतरोडी पोलिसांत केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यांनी दुपारी दीड वाजेपर्यंत बेलतरोडी पोलिसांत लेखी तक्रार देऊन चर्चा केली. त्यानंतर मात्र, त्या पोलीस ठाण्यातून कुणाशीही न बोलता निघून गेल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पल्लवी कोरटकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या न बोलताच निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरटकरच्या अडचणी पुन्हा वाढल्या

आतापर्यंत कोरटकरने मी धमकी दिलीच नाही, माझा आवाज मॉर्फ केल्याचा दावा केला होता. मात्र, आता कोल्हापूर पोलिसांनी सायबर पथकाकडून सीडीआर आणि लोकेशन प्राप्त केल्यामुळे तो फोन कोरटकरनेच केला होता, हे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरटकर पोलिसांपासून दूर पळत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Story img Loader