गडचिरोली : राज्यभरात विविध ठिकाणी भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहे. यात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यांतर्गत पदाधिकाऱ्यांची निवड झालेली असून आता जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी खलबत सुरू आहे. गडचिरोलीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने त्यांनाच संधी देण्यात येईल किंवा पुन्हा एका ‘ओबीसी’ नेत्यांची निवड पक्षश्रेष्ठी करू शकते, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

गडचिरोलीत २७ एप्रिलरोजी विश्रामगृहात जिल्हाध्यक्षाच्या निवडी संदर्भात बैठक पार पडली. यात जिल्ह्यातील कोअर कमिटीचे ३१ पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी आपली पसंत गुप्तपणे पक्षश्रेष्ठीकडे पाठविली आहे. पक्षाची जिल्ह्यांतर्गत कार्यकारणी घोषित झाल्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री असल्याने त्यांचे गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्ष पदाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

मागील कार्यकाळात भाजपने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात ‘ओबीसी’ नेत्यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली होती. विधानसभा निवडणुकात त्याचे परिणामही दिसले. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी जिल्हाध्यक्ष पदाची निवड महत्वाची आहे. गडचिरोलीत तीनही विधानसभा आणि लोकसभा आदिवासींकरिता राखीव असल्याने जातीयदृष्ट्या राजकीय समतोल साधण्यासाठी संघटनात्मक पदावर ‘ओबीसी’ चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या घडीला इच्छुकांची संख्या अधिक असली तरी विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, गोविंद सारडा ही प्रमुख नावे चर्चेत आहे. परंतु भाजपने ‘ओबीसी कार्ड’ खेळल्यास प्रशांत वाघरे किंवा अनिल पोहनकर यांची निवड निश्चित मानली जात आहे.

गटबाजीचे आव्हान

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला गटबाजीचा प्रचंड फटका बसला होता. संघटनात्मक निवडणुकीमध्ये देखील माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी खासदार अशोक नेते, आरमोरीचे सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार या नेत्यांनी आपल्या गोटातील नेत्यांसाठी मोर्चेबंधणी केली आहे. तर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मात्र सावध पवित्रा घेत पक्षश्रेष्ठीच्या निवडीला प्राधान्य दिल्याचे कळते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.