बुलढाणा: ‘जे पेरले जाते तेच उगवत असते, हा निसर्गाचा नियमच आहे. जसे कराल तसे भराल ही जगाची रीतभातच आहे. यामुळे मराठवाड्यात त्यांनी जे केले त्याचे पडसाद ठाणे येथे उमटले. मराठवाड्यात तुम्ही जे काही केले, त्याचे हे प्रत्युत्तर असल्याची रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वरील तिखट शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढले. त्यांनी हे विधान करून ठाकरेंना एक प्रकारे डिवचले आहे.
केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव हे आज सोमवारी, १२ ऑगस्टला बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाणा येथे शासकीय बैठकांना हजेरी लावून त्यांनी विविध योजनाच्या अमलबजावणीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्षात जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्यांचा ‘ऑन दि स्पॉट’ निपटारा केला. यानंतर निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिकरित्या संवाद साधला. याप्रसंगी ठाणे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी विचारणा केली असता जाधव यांनी वरील शब्दांत प्रतिक्रिया दिली.
उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या. त्यांना सुपारी बहाद्दर असे संबोधित केले. त्यामुळे जे पेरले ते उगवले या न्यायाने याचे पडसाद ठाणे येथे उमटले. ठाणे येथे संकल्प मेळाव्यास मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी येत असताना त्यांच्या वाहनावर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शेण, बांगड्या, नारळ फेकले. मन सैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे किंबहुना हे प्रतिक्रियात्मक प्रत्युत्तर दिले आहे. निसर्गाचा नियम आहे, जे पेरले जातं तेच उगवत असते, अशी प्रतिक्रियाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
‘सीएम’साठी लाचार
दरम्यान या अनौपचारिक चर्चेत, उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केलेल्या बहुचर्चित दिल्ली दौऱ्याद्दल विचारले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत टोमणे लगावले. महाराष्ट्र राज्याला चौफेर विकासाकडे नेणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली येथे जातात, तेव्हा हेच महाशय (ठाकरे) त्यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करतात, वाट्टेल ते बोलतात. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पाय दाबायला, मुजरा घालायला जातात अशी टीका करतात. आता ते (ठाकरे) दिल्लीला कशाला गेले, कुणाला कुर्निसात, अन मुजरे करायला वा लोटांगण घालायला गेले होते ? असा खोचक अन करडा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
‘मुंगेरी लाल के हसीन सपने’या धर्तीवर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हे पछाडले असून लाचार झाले आहे. त्यामुळे ते यासाठीच काँग्रेसचे लांगूनचालन, मनधरणी करण्यासाठी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते, असा घणाघात जाधव यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस असल्याचे सांगतात. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्याही पदाची लालसा बाळगली नाही, त्यासाठी लाचारी दाखविली नाही. ते कधीच कुणाच्या दारावर गेले नाही, त्यांनी सदैव आपला स्वाभिमान जपला. याउलट उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी लाचार झाले असून मित्रपक्षांच्या नेत्याचे उंबरठे झिजवत असल्याची टीका प्रतापराव जाधव यांनी यावेळी बोलताना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिल्लीला जातात ते महाराष्ट्र राज्याच्या विकास योजना, प्रकल्पाना चालना देण्यासाठी, भरघोस निधी आणण्यासाठी जातात. हा फरक आहे. केंद्र सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी आजपर्यंत भरघोस विकास निधी दिला. भरभरून योजना मंजूर केल्या आहे. शिंदे, फडणवीस, पवार हे सत्ताधारी नेते आहेत, ते केंद्राच्या निधीसाठी दिल्लीला जाणारच किंबहुना ते स्वाभाविक आहे. मात्र ठाकरे दिल्लीला कश्यासाठी आणि कुणासमोर लोटांगण घालायला गेलेत ? हा खरा प्रश्न आहे. असे करून त्यांनी बाणेदार ठाकरे घराण्याची पत घालविली असल्याचा घणाघात केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी या चर्चेत केला.
© The Indian Express (P) Ltd