लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : चुरशीची तिरंगी लढत ठरलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता आता गगनाला भिडली आहे. लाखो मतदारांसह रिंगणातील प्रमुख उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांनी आपापल्या विजयाचे दावे केले आहेत. बुलढाण्यातून (शिवसेना शिंदे गट) महायुतीतर्फे लढणारे प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा निवडणूक लढण्याचा विक्रम केला आहे. सन २००९, २०१४ आणि २०१९ अश्या सलग तीन लढतीत त्यांनी विजय मिळविला आहे. यंदाच्या लढतीतही विजयाची ‘गॅरंटी’ असल्याचे ते म्हणाले. बुलढाणा मतदारसंघ हा, शिवसेना अर्थात युतीचाच गड राहिला आहे. बुलढाणा युतीचा गड होता, आहे आणि पुढेही राहणार आहे.

आणखी वाचा-अमरावती : निकालाची उत्‍कंठा! नवनीत राणा, बळवंत वानखडे, दिनेश बुबसह सर्वांचेच विजयाचे दावे

यंदाही युतीचाच विजय होणार असा खणखणीत दावा जाधव यांनी बोलून दाखविला आहे. जनता आणि मतदार यांची पसंती महायुतीच असल्याचे उद्या ४ जूनच्या निकालातून सिद्ध होणार आहे. पक्षनेत्यांनी अनैसर्गिक युती केल्याने आम्ही उठाव करून पक्षातून बाहेर पडलो.यात पक्ष फोडणे किंवा गद्दारीचा प्रश्नच उदभवत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे पाईक आहोत. यामुळे यंदाही आपणच बहुमताने जिंकणार असा आत्मविश्वास प्रतापराव जाधव यांनी बोलून दाखविला आहे.

उबाठा अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना विजयाचा प्रचंड आत्मविश्वास असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. यंदाच्या निवडणूक मध्ये परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे खेडेकर म्हणाले. शिवसेनेतील बंडखोरांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, याबद्धल लाखो मतदारात प्रचंड रोष आहे. जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात तर जास्तच रोष असल्याचे प्रचारादरम्यान स्पष्टपणे जाणवले. हा रोष मतदानातून दिसणार आहे.

आणखी वाचा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात,‘जनतेच्या आशीर्वादाने लोकसभा जिंकणार’

त्यामुळे प्रतापराव जाधव यांना गद्धारीची फळे भोगावी लागणारच असा दावा खेडेकर यांनी बोलून दाखविला. मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे असणे म्हणजे सर्व काही ‘ओके’ नव्हे. जाधव यांनी सतत मतदारांना गृहीत धरण्याची चूक केली आहे. ती यंदा घोडचूक ठरणार असून २०२४ च्या लढतीत परिवर्तन अटळ असल्याचा दावा खेडेकर यांनी केला. आपला विजय निश्चित असल्याचे सांगून ‘आता दिल्ली दूर नव्हे’ अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बुलढाण्यातील लढतीला तिरंगी वळणावर नेणारे अपक्ष उमेदवार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अनौपचारिक चर्चेत ‘एक्झिट पोल’वर आपला विश्वास नसल्याचे स्पष्टपणे सांगून त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे भंपकपणाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन केले. आहे. मात्र, बुलढाणा मतदारसंघात ज्याप्रमाणे मला पाठबळ मिळाले ते लक्षात घेता जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विजय होईल यावर माझा ठाम विश्वास आहे. परिवर्तन वादी, विकासप्रेमी मतदार, शेतकरी, युवा, ग्रामीण जनता यांनी यंदाची निवडणूक हाती घेतली होती. त्यांनी मतदारसंघाचे वाटोळे करणाऱ्या खासदाराना सपशेल नाकारले आहे. आपली लढत महायुतीशीच झाली. त्यामुळे बुलढाणा मतदारसंघात आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी बोलून दाखविला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prataprao jadhav narendra khedekar ravikant tupkar have claimed their respective victories scm 61 mrj
Show comments