बुलढाणा : लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती मध्ये भाजप दीडशे ते एकशे साठ जागा मागणार ही केवळ चर्चा, अफवा असल्याची रोखठोक प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी येथे केले.

महायुतीतील शिवसेना (शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या मित्र पक्षांनाही सन्मानजनक जागा मिळणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे. युतीतील जागा वाटप अतिशय सुरळीतपणे पार पडणार असून पितृपक्ष नंतर जागा वाटप जाहीर करण्यात येईल असे भाकीत त्यांनी केले.

आम्ही हिंदू, कट्टर हिंदुत्ववादी असल्याने पितृपक्ष पाळण्यात गैर काय? असा उलट सवालही केंद्रीयमंत्री जाधव यांनी विचारला. बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आज मंगळवारी  १ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान संवाद हा कार्यक्रम पार पडला. यानंतर प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत त्यांनी संवाद साधला.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी गत शंभर दिवसातील आपल्या मंत्रालयाच्या कामगिरीचा धावता आढावा सादर केला. यावेळी विचारण्यात आलेली राजकीय प्रश्नांवर त्यांनी रोखठोक उत्तरे दिलीत. विधानसभेत भारतीय जनता पार्टी १६० जागासाठी आग्रही असून तशी त्यांची मागणी असल्याची चर्चा आहे.त्यामुळे भाजप शिंदे गट  आणि अजितदादा गटाला १२८ जागांवर गुंडाळनार काय? असे विचारले असता १६० जागा मागणी ही केवळ चर्चा,नव्हे अफवा असल्याचे ते म्हणाले. ही केवळ कार्यकर्त्यांतील चर्चा असल्याचे सांगून मित्र पक्षाना देखील सन्मानजनक जागा मिळतील असा दावा जाधव यांनी केला.

हेही वाचा >>>जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांचे लेखणी बंद

लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचा विजयाचा ‘स्ट्राईक रेट’  भाजपपेक्षा जास्त असल्याने विधानसभेत  (शिवसेनेला ) किती जागा अपेक्षित आहे, या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.महायुतीच्या जागा वाटपात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ हा महत्वाचा आणि निर्णायक घटक राहणार आहे.

कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडून येऊ शकतो, मागील लढतीतील त्या पक्षाची कामगिरी, निकाल हे जागा वाटपाचे मुख्य निकष राहतील अशी माहिती नामदार जाधव यांनी यावेळी बोलताना दिली. पितृपक्ष नंतर जागा वाटप जाहीर करण्यात येईल याचा पुनरुच्चार करून आम्हाला जागा वाटप किंवा अन्य मागणीसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही.

मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला जाऊन लहान पक्षाच्या नेत्याना ‘मला सीएम सीएम करा’ अशी पाया पडण्याची, लाळ घोटण्याची आम्हाला गरज नसल्याचा मार्मिक टोला त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वाभिमानाने जगले, ते मुंबई सोडून कधीच बाहेर गेले नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>“तुझ्या बहिणीशी माझे प्रेमसंबंध, आम्ही शारीरिक…” बोलणे ऐकताच भावाने केला मित्राचा खून

शंभर दिवसांचा ‘पीएमओ’ ला अहवाल

 केंद्रीय मंत्री पदाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला देण्याचे निर्देश होते. त्यानुसार अहवाल सादर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मंत्रालयाने जोरदार कामगिरी बजावल्याचा दावा नामदार जाधव यांनी यावेळी बोलून दाखविला.

१०० दिवसांत आयुष मंत्रालयाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिल्या. देशात १० ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सुरू होत आहे अशी माहिती यावेळी ना जाधव यांनी दिली.

आधी आयुर्वेदिक औषधी सहज उपलब्ध होत नव्हती मात्र आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयुष औषधी केंद्र आम्ही सुरू करत आहोत. जिल्हा रुग्णालयात आता अमृत स्टोअर सुरू करून तिथे उच्च दर्जाची  आयुर्वेदिक औषधे सवलतीच्या दरात मिळणार  आहे. गेल्या १० वर्षात २२ एम्स रुग्णालये देशात उभे राहिलेत. २०१४ पूर्वी देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते आता ती संख्या ७७४ झाली. आधी देशभरात मेडिकलच्या जागा ५१ हजार होत्या, आता त्यात वाढ होऊन ११५८१२ अधिक ८०० एवढ्या मेडिकल जागा आता निर्माण झाल्या आहेत असेही जाधव म्हणाले. खामगाव जालना मार्गाचा विषय सुद्धा पुढे गेला आहे. रेल्वे बोर्डाकडून हा विषय आता नीती आयोगाकडे जाईल आणि त्यानंतर हा विषय केंद्रिय कॅबिनेट पुढे जाईल असे जाधव म्हणाले.