चंद्रपूर : माझ्या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचे तिकीट मीच वाटणार आहे, असं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान धानोरकर यांनी असे वक्तव्य करून थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच आवाहन दिले आहे. तर प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवर चालणारा आहे. इथे हायकामांड व समितीच्या माध्यमातून निर्णय होतो असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा…पुतळ्याआडून कोणाचे हितरक्षण ? नागपुरात प्रशासनाच्या भूमिकेवर शंका

चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा येथील सत्कार कार्यक्रमात बोलताना चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात आता मीच तिकीट वाटणार आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. या लोकसभा मतदार संघात अनेक जण विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत.

विधानसभेची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी कडून लोकशाही पद्धतीने उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे. मात्र आता नवनिर्वाचित खासदार विधानसभेच्या तिकिटा मीच वाटणार आहे असे जाहीर केल्याने अनेक काँग्रेस पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून या पक्षात अनेक जण कधीतरी विधानसभेची उमेदवारी मिळेल या अपेक्षेने काम करीत आहे. पक्ष आमच्या कामाची दखल घेईल व विधानसभेची संधी देईल या आशेवर अनेक जण आहेत. मात्र आता खासदार धानोरकर यांनी मीच विधानसभेच्या तिकीट ठरवणार अस जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक इच्छूक अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे खासदार धानोरकर यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या समक्ष हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आमदार धोटे यांचेही तिकीट खासदार धानोरकर ठरवणार आहे असाच याचा अर्थ आहे.

हेही वाचा…गडचिरोली : अर्चना पुट्टेवारच्या आशीर्वादाने भूमीअभिलेखमधील ‘तो’ कर्मचारीच बनला भूमाफिया? गैरमार्गाने अल्पावधीत कोट्यधीश

खासदार धानोरकर यांच्या या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. या पक्षात खासदार एखाद्याला उमेदवारी द्या अशी शिफारस करू शकतो. मात्र तिकीट देणे व नाकारणे हा पूर्ण अधिकार काँग्रेस हायकमांड व यासाठी गठित केलेली समिती यांचा असतो असे सांगितले. दरम्यान खासदार धानोरकर यांनी असे वक्तव्य करून एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच आवाहन दिले अशीही चर्चा आहे.

प्रतिभा धानोरकर लोकसभा निवडणूक २ लाख ६० हजार मतांनी विजयी झाल्या पासून राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच खासदार धानोरकर यांनी काँग्रेस पक्षाने आमदार सुभाष धोटे यांना लोकसभेची उमेदवारी दिली असती तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार घरी बसून निवडून आले असते असे वक्तव्य केले. केवळ एका विजयानंतर स्वपक्षाच्या जिल्हाध्यक्षा यांना असे कमी लेखने योग्य नाही अशी चर्चा आहे.

हेही वाचा…वर्धा : निराधार वृद्धांना आसरा व मोफत उपचार, युथ फॉर चेंजचा मदतीचा हात

धानोरकर यांना खासदार बनविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची आहे. मात्र धोटे यांना तिकीट दिली असती तर मुनगंटीवार घरी बसून विजयी झाले असते असे म्हणणे योग्य नाही. विशेष म्हणजे आमदार धोटे यांच्याच राजुरा विधानसभा मतदार संघातून खासदार धानोरकर यांना ५८ हजार इतके मताधिक्य मिळाले आहे. धानोरकर यांच्या स्वतःच्या वरोरा विधानसभा मतदार संघा पेक्षा राजुरा येथून धोटे यांनी सर्वाधिक आघाडी दिल्यानंतर असे वक्तव्य करणे योग्य नाही असे अनेकांचे मत आहे. इतकी प्रचंड आघाडी दिल्यानंतर धानोरकर आगामी विधानसभा निवडणुकीत धोटे यांना उमेदवारी देऊन इतक्या प्रचंड मतांनी आणणार का असाही प्रश्न चर्चिला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratibha dhanorkar s claim to distribute all assembly tickets in chandrapur lok sabha constituency rsj 74 psg