लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वतमाळ : यवतमाळात आयआयटी, वाशीमला एआयआयएमएस तर पुसदला आयआयएम… मथळा वाचून कोणालाही प्रश्न पडेल, या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था या मागास भागात कधी सुरू झाल्या किंवा कधी सुरू होणार आहेत? पण असे काहीही नसून ही लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याची चाहूल आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार प्रवीण पवार (सर) यांनी यवतमाळ, वाशिम, पुसद शहरात मोठे मोठे फलक लावून या संस्था आणण्याची हमी दिली आहे. प्रवीण पवार हे खासगी ट्युशन संचालक आहेत. त्यामुळे नवमतदार विद्यार्थी हे निवडणुकीत निर्णायक राहतील या विश्वासातून त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळला आयआयटी, वाशिमला अेआयआयएमएस व पुसदला आयआयएम या संसथा आणण्यासाठी समर्थन करा, असे आवाहन करणारे हे फलक सर्वत्र लावले आहेत. प्रवीण पवार यांनी गेल्या महिन्यात जनसंवाद यात्रेचे फलक मतदारसंघात लावले होते. त्यानंतर आता या ख्यातीप्राप्त संस्था आणण्याचे फलक लावले आहे. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेणारे पवार सर यावेळी कोणाकडून लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पवार सर फलकांवर वापरत असलेली रंगसंगती बघता ते भाजपाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-बँक घोटाळ्यात शिक्षा झालेले काँग्रेस नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द

यवतमाळ येथे पाच वर्षांपूर्वी उभारलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल विद्यमान खासदार व इतर लोकप्रतिनिधींना अद्याप सुरू करता आलेले नाही. या शहरातील अभियांत्रिकी, मेडिकल, आयटीआय ही महाविद्यालये सुविधांपासून वंचित आहेत. अशा स्थितीत निवडणूक लढवू इच्छिणारा एक उमेदवार थेट आयआयटी, अेआयआयएमएस, आयआयएम या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या संस्था आणण्याचे प्रलोभन दाखवून नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न सुज्ञ मतदारांना पडला आहे. ज्या शहरांत अद्यापही मुलभूत सुविधा मतदारांना मिळत नाही, त्या शहरांमध्ये या संस्था आणण्याचे आमीष पवार यांना कितपत साथ देणार हे येत्या निवडणुकीत दिसेलच.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praveen pawar assured to bring these institutions by putting up big boards in yavatmal washim pusad nrp 78 mrj