अकोला : काँग्रेस पक्ष विकास करू शकत नाही. विकास कार्य फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे काँग्रेसमधील उर्वरित चांगले नेतेसुद्धा भाजपमध्ये येतील. गेले ४०-५० वर्ष जे काँग्रेसला जमले नाही, ते विकास कार्य भाजपने केले आहे, असा दावा भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे आज केला.
अकोल्यातील खुले नाट्यगृहात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेश चिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर, अनुप धोत्रे आदींसह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – अमरावती लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा; महायुतीत बेबनाव
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, आता राजकारणाची दिशा बदलली. नव्या पिढीला विकासाची भाषा कळते. जातीपातीचे राजकारण नव्या पिढीला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाचे राजकारण दाखवले. त्या भरवशावर निवडणुका जिंकून दाखवल्या. विकासाच्या बाजूने उभे राहण्यासाठी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास जनतेसाठी काम करणारे नेता आहेत. विकासाची दृष्टी देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे. तिन्ही बलाढ्य नेते आज महायुतीत विकासासाठी एकत्र आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एकदिलाने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. राज्यात महायुतीचे समन्वयातून कार्य सुरू आहे. सरकारची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेळावे घेतले जात आहे. समाजाचा विकास हा अंतिम उद्दिष्ट असतो. सरकार व नेतृत्व आपल्याकडे आहे. विकासाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्र येत काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांचा राष्ट्रवादीचा पक्ष गेला. आज काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. आता काँग्रेसलासुद्धा घरघर लागली आहे. विकासाच्या राजमार्गावर येण्यासाठी ते आपल्या सोबत आले. हळूहळू काँग्रेसमधील इतर चांगले नेतेसुद्धा भाजपमध्ये येतील, असे प्रवीण दरेकर म्हणाले. यावेळी विविध नेत्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची ‘दिल्लीवारी’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून वारंवार दिल्लीला जातात म्हणून टीका केली जाते. घरात बसून राहणाऱ्यांना काय कळणार? महायुतीचे नेते दिल्लीवारी करून राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भरभरून निधी घेऊन येतात, असे आमदार प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले.