आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण, काशी-मथुरा मंदिर, लव्ह जिहाद याविषयांवर कायदा करण्याच्या मुद्द्यावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. “सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोक आंदोलन करतात तेव्हा हसू येतं. आंदोलन कशाला करता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरात बसून कायदा करा,” असं मत प्रविण तोगडीयांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये बोलत होते.
प्रविण तोगडीया म्हणाले, “जेव्हा आपण सरकारमध्ये नसतो तेव्हा आंदोलन करत मागणी केली पाहिजे. आता तर आंदोलन करणाऱ्यांच्या सहकाऱ्यांचं सरकार आहे. आंदोलन कशाला करता,कायदा मंजूर करा.”
“सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोक आंदोलन करतात तेव्हा थोडं हसू येतं”
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन निश्चित करा. कायदा तयार होईल. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोक आंदोलन करतात तेव्हा थोडं हसू येतं. घरात बसून कायदा करा, आंदोलनाची काय गरज आहे?”, असा प्रश्न प्रवीण तोगडीयांनी विचारला.
“…तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका”
प्रविण तोगडिया म्हणाले, “आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेला वाटतं की, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, जर लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल. त्यामुळे केंद्र सरकारने ही लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा तात्काळ तयार करावा.”
हेही वाचा : “शिवसेनेचा आरक्षणाला-मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध, त्यामुळे आता…”, फडणवीसांचं मोठं विधान
“मोदी शाहांनी सरकारच्या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा”
“नरेंद्र मोदी आणि अमित शाह भाजपाच्या बहुमताच्या सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. त्यांनी सरकारच्या या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदाही तयार करावा. तसेच काशी आणि मथुरा मंदिर तयार करण्यासाठी आणि लव्ह जिहाद विरोधी कायदाही तयार करावा,” अशी मागणी प्रविण तोगडीया यांनी केली.
“राम मंदिर २५ पीढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे”
“राम मंदिर ४५० वर्षे म्हणजे २५ पीढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे. या सरकारने काशी-मथुरा मंदिर निर्माणासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला तर त्यांना नक्की यश मिळेल,” असंही तोगडीयांनी नमूद केलं.