लोकसत्ता टीम
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील उमेदवारांना बार्टीमार्फत जेईई, नीट परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुंबई, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई प्रशिक्षणासाठी १०० व नीट प्रशिक्षणासाठी १०० विद्याथ्यर्थ्यांची निवड करण्याकरिता बार्टीमार्फत १३ जुलै २०२४ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.
सदर जाहिरातीद्वारे ०८/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज / नोंदणी करण्याबाबत नमूद करण्यात आले होते. त्याअनुषंगाने विद्याथ्यांच्या प्राप्त ऑनलाईन माहितीच्या आधारे बार्टीमार्फत नागपूर या ठिकाणासाठी जेईई व नीट करिता तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर निवड व प्रतीक्षा यादी ही तात्पुरत्या स्वरुपाची असून विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर निवड यादी अंतिम करण्यात येईल. नागपूर या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी बार्टी येथील नागपूर-उपकेंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, २ रा माळा ए-विंग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, दीक्षाभूमी रोड, येथे २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० पासून करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-अमरावतीत रक्तरंजित संघर्ष, सूड उगवण्यासाठी युवकाची हत्या
इतक्या जागा आरक्षित
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी अकरावी(विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला ३० टक्के, दिव्यांग ५ टक्के, अनाथ १ टक्के, वंचित ५ टक्के जागा आरक्षित असतील.
महत्त्वाच्या सूचना
विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे नमूद मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे.
- १० वी उत्तीर्ण गुणपत्रीका.
- रहिवासी दाखला.
- उत्पन्नाचा दाखला.
- जात प्रमाणपत्र.
- ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश असल्याचे बोनाफाईड
- स्वाधार योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र
आणखी वाचा-MPSC Exam : पाच हजार विद्यार्थ्यांसाठी दोन लाख उमेदवारांचे नुकसान, आता परीक्षा ऑक्टोबरमध्ये?
एका प्रशिक्षणाची निवड करणे आवश्यक
ऑनलाईन अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी जेईई व नीट अशा दोन्ही प्रशिक्षणाकरिता अर्ज केलेले आहे. अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास विद्याथ्यांनी कागदपत्रे तपासणी दरम्यान कोणत्याही एका प्रशिक्षणाची निवड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास विद्यार्थ्यांनी कागदपत्रे तपासणी दरम्यान कोणत्याही एका ठिकाणाची प्रशिक्षणासाठी निवड करणे आवश्यक आहे.