बुलढाणा : जिल्ह्यासह विदर्भ व राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या व तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथील घटमांडणीचे भाकीत आज, रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले.
काल शनिवारी रात्रीपासून मुक्कामी असलेल्या हजारो शेतकरी, कृषी व्यावसायिक व ग्रामस्थांच्या साक्षीने पुंजाजी महाराज यांनी पीक, पाऊस व राजकीय विषयक भाकीत (नित्कर्ष) जाहीर केले. त्यानुसार कापूस पीक सर्व साधारण (उत्पादन), ज्वारी पीक चांगले राहणार असून त्याला भावही चांगला राहील. तूर, मूग, उडीद ही पिके ‘मोघम’ राहणार असून उत्पादन मध्यम स्वरुपाचे राहील. तीळ पिकाची नासाडी होणार असून बाजरी पीक साधारण राहील. तांदूळ पीक चांगले ( समाधानकारक उत्पादन) राहणार असून भावात तेजी राहील. मठ, जवस पीक साधारण राहणार असून नासाडी होण्याची चिन्हे आहे. लाख पीक साधारण राहणार असले तरी भावात तेजी राहील. गहू, वाटाणा ही पिके चांगली राहणार. जास्त उत्पादन होऊन भावपण चांगला राहील, असे भाकीत वर्तविण्यात आले.
हेही वाचा – भंडारा : बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग
संघर्ष पण ‘राजा’ कायम!
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या राजकीय-सामाजिक भाकिताबाबत व्यापक उत्सुकता होती. घटमांडणी मधील ‘गादी’ हलली नसली तरी त्यावर माती आली आहे. त्यामुळे ‘राजा कायम’ राहील, पण त्याला बराच संघर्ष करावा लागेल, असे भाकीत आहे. संरक्षण खाते (यंत्रणा) मजबूत राहील, मात्र भारताला परकीय देशाचा त्रास राहील, असा नित्कर्ष आहे. देशाची आर्थिक परिस्थितीदेखील साधारण राहील, असा अंदाज आहे.
हेही वाचा – गडचिरोली : नोकरीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र
पाऊस साधारण अन् अवकाळीचा हैदोस!
पर्जन्यमानाबद्दल पुंजाजी महाराजांनी वर्तविलेली भाकिते लाखो शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारी ठरली. खरीपसाठी महत्त्वाच्या जूनमध्ये कमी, जुलैमध्ये साधारण पाऊस राहील. ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. अवकाळी पाऊस पुढे पण सतावणार, असे भाकीत सांगण्यात आले.