४० ते ४५ टक्के महिलांकडे तिशीनंतर पाळणा हलतो
महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : प्रत्येक क्षेत्रात महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. उच्च शिक्षण, लग्नानंतर स्वत:चे ‘करिअर’ करण्यावर भर, या व इतर तत्सम कारणांमुळे ४० ते ४५ टक्के महिला वयाच्या तिशीनंतर आई होत असल्याचे निरीक्षण उपराजधानीतील स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. उशिरा होणारे विवाह व बाळ केव्हा होऊ देण्याबाबातच्या नियोजनामुळे या महिलांमध्ये वंधत्वाच्या समस्या वाढल्याचा दावा प्रसूती तज्ज्ञांचा आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर: चार जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद
नागपुरात शहरी भागात वयाची तिशी ओलांडल्यानंतर आई होणाऱ्या महिलांचे प्रमाण ४० ते ४५ टक्यांच्या जवळपास आहे. ग्रामीणमध्येही हे प्रमाण वाढत आहे. उच्च शिक्षणानंतर ‘करियर’करणे, विवाहानंतरही काही वर्षानंतर बाळाचे नियोजन करणे, सौंदर्याची जोपासना यासह अनेक कारणे विलंबाने आई होण्याला कारणीभूत आहेत. हल्ली बऱ्याच कुटुंबात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मूल झाल्यास त्याला वेळ देता येईल का? या विचारानेही बाळ होऊ देण्याबाबत नियोजन लांबवले जाते. विवाह उशिरा झाल्यानंतर वाढत्या वयात गर्भधारणा महिला आणि बाळासाठी धोकादायक बाब आहे. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये स्त्री बीजही कमी होतात. महिलेचे वय तिशीच्या पुढे गेल्यास ८० टक्के स्त्रीबीज तयार होतात. वय ३५ पुढे गेल्यास ५० टक्के तर चाळीशीनंतर १० टक्केच स्त्रीबीज तयार होत असल्याचे उपराजधानीतील सुप्रसिद्ध स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नागपूर : शहराच्या गौरव गीताचा महापालिका प्रशासनाला विसर
तिशीतील महिलांमध्ये वंधत्वाचे प्रमाण दुप्पट
तीस वर्षांपूर्वी प्रसूतीसाठी येणाऱ्या बहुतांश महिलांचा वयोगट २३ ते २४ वयोगटातील असायचा. आता वयाच्या ३० ते ३५ वर्षानंतरच महिला प्रसूती व वंधत्वाच्या समस्या घेऊन येतात. ग्रामीण भागातही महिलांमध्ये आई होण्याचे वय वाढले. विलंबाने झालेल्या विवाहामुळे मागील तीस वर्षांमध्ये वंधत्वाचे प्रमाण दुप्पट-तिप्पटीने वाढले. नव्वदीच्या दशकात शहरी भागात उशिरा विवाह होण्याचे प्रमाण १० ते १५ टक्के होते. आता ते ४० ते ४५ टक्क्यांवर गेले. प्रत्यक्षात आई होण्यासाठी २० ते २५ हेच वय योग्य असून, पंचविशीनंतर गर्भधारणेसाठीची आवश्यक क्षमता दरवर्षी दहा टक्क्यांनी कमी होते, असे स्त्री व पक्सूतीरोग तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी सांगितले.
पस्तिशीनंतर जन्मणाऱ्या मुलांमध्ये विविध दोष निर्माण होण्याचा धोका
पस्तिशीनंतर आई होणाऱ्या महिलांना रक्तदाब, मधुमेह, प्रसूतीच्यावेळी अधिक रक्तस्त्राव अशा अडचणींना तोंड द्यावे लागते. पस्तिशीनंतर जन्मणाऱ्या मुलांमध्ये विविध दोष निर्माण होण्याचाही धोका असतो. मुलांच्या बोलण्यात तोतरेपणा, अनुवांशिक समस्या किंवा शारीरिक व्यंगाचाही धोका वाढतो. उशिराने माता होणाऱ्या महिलांचे प्रमाण शहरातील ४० टक्क्याहून अधिक असून ग्रामीण भागातही आता हे प्रमाण वाढतांना दिसत आहे, अशी माहिती मेडिकलच्या स्त्री व प्रसुतीरोग विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जुझार फिदवी यांनी दिली.
विलंबाने बाळाच्या नियोजनाचे धोके
– सामान्य प्रसूती असुरक्षित होते
– गर्भाशयाचा त्रास, सिझेरियनचा धोका
– शारीरिक लवचीकता कमी होत असल्याने प्रसूतीत गुंतागुंत
– स्त्री बिजाणू निर्मितीत अडथळे
– गर्भपाताची शक्यता बळावणे