लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर: एका १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून किटकनाशक प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तपासादरम्यान पीडित तरुणी ही गर्भवती असून आरोपी तरुण जिवे मारण्याची धमकी देत सतत तिच्यावर बलात्कार करीत होता,अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. तरुणीने अनेकदा पोलिसात तक्रार केली होती. मात्र कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने निराश होऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात आता लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. रोहित विजय सोळंकी (२२) रा. आकाशनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पीडित तरुणी आणि रोहितमध्ये प्रेम संबंध होते. रोहित हा तापट स्वभावाचा आहे. लहान-लहान गोष्टींवरून तो प्रेयसीसह कुटुंबियातील अन्य सदस्यांशी भांडण करीत होता. त्यामुळे तरुणीने दुरावा करीत त्याचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. मात्र त्यानंतरही रोहित तिला त्रास देत होता. भररस्त्यात अडवून तिला धमकावत होता. तिच्या घरी जाऊन हैदोस घालत होता. दोघांचे एकत्र असलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.तरुणीने चार वेळा रोहित विरुद्ध हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही.
हेही वाचा… ग्रंथालय संघाची वारी, पवनार ते वर्धा पदयात्रेद्वारे समस्यांवर वेधले लक्ष
रविवारीही रोहितने दुसऱ्या क्रमांकावरून तरुणीला फोन केला आणि भेटायला बोलावले. जबरीने तिला बेसा-घोगली मार्गावर घेऊन गेला. निर्जनस्थळावर तिला मारहाण केली. त्याच्याशी संबंध ठेवले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. ‘मॉर्फ’ करून तिचे अश्लील फोटो बनवले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केला. त्याच्या छळाला कंटाळून तरुणीने सोमवारी रात्री घरात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तरुणी दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. प्रकरण चिघडलेले पाहून पोलिसांनी तरुणीची सविस्तर जबानी नोंदवून रोहित विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली.