गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना घडली. मनिषा शत्रुघ्न धुर्वे (३१),रा.विसोरा असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयापुढे आंदोलन करीत दोषी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करेपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, येथील कंत्राटी डॉक्टर आणि परिचरेकेची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

विसोरा येथील मनिषा धुर्वे हिला प्रसूतीसाठी १३ एप्रिलला गावातीलच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर बराच वेळ होऊनही मनिषाची प्रसूती झाली नाही. त्यामुळे मनिषाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावून तिला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, विसोरा येथील उपकेंद्रातील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी ‘आणखी थोडा वेळ थांबा, मनिषाची प्रसूती येथेच होईल’, असे तिच्या कुटुंबीयांना सांगून रुग्णवाहिका परत पाठवली. परंतु तब्बल १२ तास उलटूनही मनिषा प्रसूत झाली नाही. शेवटी तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनीही प्रसूती होईल, असे सांगितले. परंतु प्रसूती न झाल्याने मनिषाच्या कुटुंबीयांना १४ एप्रिलच्या संध्याकाळी तिला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी मनिषाला मृत घोषित केले. तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाला.

त्यानंतर आज देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, शहरप्रमुख विकास प्रधान, डिंपल चावला, जसपालसिंह चावला, सचिन राऊत, हितेश किलनाके आणि गावकऱ्यांनी आंदोलन करीत दोषी डॉक्टर आणि परिचारिकांना निलंबित करेपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे.

चौकशीसाठी समिती

या घटनेसंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी, संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेची सेवासमाप्तीचे आदेश दिल्याचे सांगितले. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी व इतर चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. असे स्पष्ट केले.