अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये महिलेच्या पोटावर जखमा झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोमा गावातील एका आशा वर्करने घराच्या बांधकामावरुन झालेल्या वादातून गर्भवती महिलेवर अमानुष हल्ला केला. यात तिचे दातही पडल्याची माहिती समोर आली असून तिच्या पतीलादेखील काठीने मारहाण करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात आशा वर्कर महिलेने गर्भवती महिलेला मारहाण केली. या अमानुष मारहाणीमध्ये तिचे दात पडले असून तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांना चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

पीडित महिला ही २५ वर्षांची असून तीन महिन्यांची गर्भवती आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घरातील जागेवर शौचालय बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्डयात मजुरांकरवी सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सुरू असताना शेजारी राहणाऱ्या बबलू जगलाल अथोटे याने सिमेंटच्या कामावर नालीच्या पाईपमधून पाणी सोडल्याने बांधकाम खराब झाले, म्हणून पीडित महिलेने जाब विचारला, त्यावर अथोटे याने पीडित महिलेला शिवीगाळ केली. आरोपी बबलू अथोटे हा पीडित महिलेचा नातेवाईक आहे. त्यानंतर बबलू अथोटे याची पत्नी संध्या आणि दोन मुलींनी गर्भवती महिलेला मारहाण केली. त्यात ती जमिनीवर पडल्याने दगड लागून तिचे दोन दात तुटले. अथोटे कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या पतीलाही विटा आणि काठीने मारहाण केली. संध्या ही आशा वर्कर म्हणून काम करते, अशी माहिती मिळाली आहे.

मारहाणीदरम्यान पीडित महिलेच्या गर्भाला इजा पोहचल्याने तिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. अचलपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. तक्रारीच्या आधारे बबलू अथोटे, संध्या अथोटे आणि त्यांच्यात दोन मुलींच्या विरोधात चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली आहे.