नागपूर: सौदी अरेबीयात राहणाऱ्या गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाच्या फुफ्फुसावर पाण्याची पिशवी तयार झाली होती. ही महिला उपचारासाठी नागपुरातील न्यू एरा मदर अँड चाईल्ड हॉस्पिटलला आली. येथे  गर्भातच बाळावर  प्रक्रिया केली गेली. त्यानंतर एक आठवड्यात सिझरद्वारे यशस्वी प्रसूतीमुळे आई- बाळ दोघांनाही जीवदान मिळाले.

न्यू एरा मदर ॲन्ड चाईल्ड रुग्णालयाने केलेल्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला हायड्रोथोरॅक्स उपचार म्हणतात. दरम्यान प्रत्येक एक लाख गर्भवतीमध्ये एखाद प्रकरणात गर्भातील बाळाच्या फुप्फुसावर या पद्धतीने पाण्याची पिशवी तयार होते. त्यामुळे   फुफ्फुस व ह्रदय विकसित होण्यात अडथळे येतात. त्यामुळे आई व बाळाच्या जिवाला धोके असतात. रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद भुतडा यांच्या प्रयत्नाने यशस्वी उपचाराला यश मिळाले. बाळ गर्भात  असतांना या पद्धतीने उपचाराची नागपुरात फार कमी प्रकरणे आहेत. या उपचारात संचालक मंडळातील डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निधिस मिश्रा यांच्यासह डॉ. संजय देशमुख, डॉ. प्रिया बहे, डॉ. श्वेता भुतडा यांची भूमिका महत्वाची ठरली. या यशस्वी उपचारामुळे आता विदेशातूनही नागपुरात गुंतागुंतीची प्रक्रिया करण्यासाठी रुग्ण येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जगभरात नागपुरातील वैद्यकीय सोय- सुविधांवर रुग्णांचा विश्वास वाढत  आहे.

प्रकरण काय?

सौदी अरेबियातील २८ वर्षांची गर्भवती महिलेला प्रसूतीपूर्व केलेल्या वैद्यकीय तपासणीत गर्भातील बाळाच्या फुफ्फुसावर पाणी (हायड्रोथोरॅक्स) आढळले. महिलेला सौदी अरेबियातील उच्च केंद्रात उपचार घेण्याचा सल्ला दिला गेला. परंतु महिला माहिती काढून नागपूरच्या न्यू एरा मदर अँड चाईल्ड हॉस्पिटलमध्ये आली.  गर्भावस्थेच्या ३२ आठवड्यात तिला गर्भ औषध तज्ज्ञ डॉ. किरणश्री बकाणे यांनी  उपचार सुरू केले. या उपचारात डॉ. रितू दर्गन आणि त्यांच्या टीमची भूमिका महत्वाची होती.

उपचार काय?

गर्भातील बाळाच्या फुफ्फुसांवर आणि हृदयावरचा दबाव कमी करण्यासाठी डॉक्टरांनी द्रव बाहेर काढण्यासाठी रिअल- टाइम अल्ट्रासाऊंडद्वारे तपासणी केली. त्यानंतर थोरॅकोॲम्निओसेन्टेसिस प्रक्रिया केली गेली. त्यात गर्भातील अर्भकाच्या फुफ्फुसावरील पाण्याची पिशवी काढली गेली. त्यानंतर अर्भकातील स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. त्याच्या एक आठवड्यानंतर डॉ. रितू दर्गन यांनी सिझेरियन प्रसूती केली. आता बाळ व आई दोघेही सुरक्षित  आहेत.

Story img Loader