नागपूर: राज्यात झिकाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सर्वसामान्य नागरिकांना धडकी भरली आहे. त्यातही एकूण रुग्णांपैकी ४५ टक्के रुग्ण गर्भवती महिला असल्याने चिंता वाढली आहे. राज्यात झिकाचे एकूण चार जिल्ह्यांत रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात एडीस डासांमार्फत पसरणारा झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये आढळला होता. जानेवारी २०२४ ते १२ जुलै २०२४ पर्यंत राज्यात झिकाच्या २२ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी मे- २०२४ मध्ये कोल्हापूरमध्ये एक रुग्ण, संगमनेरला १ रुग्ण, सासवडला एक रुग्ण तर पुणे महापालिका हद्दीत तब्बल १९ रुग्णांची नोंद झाली. पुणे महापालिका हद्दीत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी १० गर्भवती महिला आहेत. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा – अमरावती: पत्नी वारंवार करायची अपमान…अखेर पतीने कुऱ्हाड काढली अन्….

लक्षणे काय?

बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात, त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. या रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नसून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही नगण्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

गुंतागुंतीची शक्यता

गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे बाळ मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते, ज्यास जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. या विषाणूचा संसर्ग गर्भावस्थेच्या मुदतीपूर्वी जन्म आणि गर्भपात यासह इतर गुंतागुंतीशी संबंधित आहे. प्रौढ आणि मुलांमध्ये झीका विषाणूच्या संसर्गाशी संबंधित न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होण्याची जोखीम आहे. ज्यात मायक्रोसिफॅली (डोक्याचा घेर कमी असणे) गिलाइनबॅरी सिंड्रोमए न्यूरोपैथी आणि मायलायटिसचा समावेश आहे.

रोगाचा प्रसार कसा होतो?

झिका हा आजार प्रामुख्याने एडीस या डासांच्या चाव्याने होतो. हा डास दिवसा चावतो. या आजाराचा प्रसार लैंगिक संपर्काद्वारे, गर्भधारणेदरम्यान आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो, रक्त आणि रक्त उत्पादनांचे रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारोपणाद्वारे होतो.

हेही वाचा – मुंबई पोलीस भरतीमधील मुख्य आरोपी पुन्हा मैदानी चाचणीमध्ये? विद्यार्थी संघटनेचा आरोप काय…

निदान व उपचार

राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा, नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर येथे या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.