लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: प्रसूती वेदनेसाठी घरातच वाट बघणे जोखमीचे आहे. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात असाच एक प्रकार घडला. रविवारी दुपारी मेडिकलच्या द्वारावर ऑटोरिक्षात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाली. डॉक्टर आणि इतर कर्मचारी तेथे धावत गेले. येथे विलंबाने प्रसूती जोखमीचे होती. म्हणून ऑटोतच प्रसूती केली गेली. सध्या आई व बाळ दोघेही सुरक्षित आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीय गटातील कुटुंबाच्या आरोग्याचे मंदिर म्हणून मेडिकलकडे बघितले जाते. रविवारी दुपारी येथील आकस्मिक विभागाच्या द्वाराजवळून एक महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान धावत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाजवळ आला. त्याने डॉक्टरांना ऑटोमध्ये प्रसूती होत असल्याचे कळवले. कोणताही वेळ न दवडता सेवेवरील डॉक्टर आणि वंदना भोयर आणि झुल्फी अली हे कर्मचारी डिलिव्हरी ट्रे आणि उरलेले सामान घेऊन धावत ऑटोकडे पोहोचले.

हेही वाचा… गोंदिया : शेतकऱ्यांना प्रतीक्षा पावसाची, मान्सून रखडल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता

सर्वांनी सामूहिक प्रयत्नाने काळजीपूर्वक ऑटोतच प्रसूती करून घेतली. प्रसूतीनंतर बाळाला औषधशास्त्र विभागातील आकस्मिक विभागात बालरोगतज्ञांना दाखविण्यात आले. बाळ सुरक्षित असल्याचे पुढे आल्यावर आई- बाळ दोघांना येथील स्त्रीरोग विभागाच्या वॉर्डात पाठवण्यात आले. मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन आई- बळाला वाचवल्याने नातेवाईकांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. या कठीण प्रसूतीसाठी वर्षा बडकी, हेमा बोपचे, श्रद्धा धारगावे यांचेही परिश्रम महत्वाचे होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant women delivery in an autorickshaw at the door of the hospital in nagpur mnb 82 dvr