|| रवींद्र पाथरे- राम भाकरे, कै. राम गणेश गडकरी नाटय़नगरी

प्रेमानंद गज्वी यांचे प्रतिपादन; नाटय़ संमेलनाचा समारोप

रुपयाच्या नाण्याला दोनच बाजू आहेत, असे आपण मानतो. प्रत्यक्षात त्याला पाच बाजू आहेत. तसेच सहिष्णुतेचेही आहे. आपल्या देशात सहिष्णुता आहे असे आपण म्हणतो. परंतु बारकाईने बघितले तर त्याचे असणे – नसणे कळून येते. राजकीय नेते हे माझे काही शत्रू नाही. आपणा सर्वामध्ये माणुसकीचे नाते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जसे म्हणतात त्याप्रमाणे सहिष्णुता ही गोष्ट प्रत्यक्ष व्यवहारात उतरली तर बरे होईल, असे मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी समारोपाच्या भाषणात व्यक्त केले.

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे  रविवारी सूप वाजले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर उपस्थित होते.

गज्वी म्हणाले की, मी प्रारंभी माझ्या नाटकीय घडणीबद्दल भाषणात बोलावे असे माझे एक मन म्हणत होते. परंतु माझे दुसरे मन मला सांगत होते की, आजूबाजूला जे घडते आहे ते सत्य तू सांगणार आहेस की नाही? त्यामुळे मी सत्य बोलायचे ठरवले. आज राजकारणी मंडळी ही राजा असतील तर आम्ही प्रजा आहोत. प्रजेला सुखी ठेवणे हे राजाचे कर्तव्यच आहे.  सामान्य जनतेचा विचार करणार नसाल आणि आपल्याच नशेत राहणार असाल तर तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. ज्यांना प्रजेला सांभाळता येत नाही ते राज्य सांभाळू शकत नाही. केवळ विनोदी भूमिका करणाऱ्यांनी गंभीर भूमिका केली पाहिजे. माणसाने रोज बदलले पाहिजे. जर तुम्ही बदलला नाहीत तर साचलेपण येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी स्वागत समितीचे कार्याध्यक्ष गिरीश  गांधी, महापौर नंदा जिचकार आणि नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी केले. यावेळी पडद्यामागील कलावंत आणि नाटय़ वितरक यांचा सन्मान करण्यात आला.

मराठीला अद्याप अभिजात दर्जा का नाही?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून रंगनाथ पठारे समितीने काही वर्षांपूर्वी अहवाल सादर करूनही हा दर्जा दिला जात नाही. आपण इतरांनी आपल्या भाषेला दर्जा देण्याची का वाट  पहावी, असा सवाल करून गज्वी म्हणाले, आपण अभिजात भाषा दिन साजरा करायला सुरुवात करू. या संबंधीचा प्रस्ताव मी नाटय़ परिषदेच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना देणार आहे. त्याचप्रमाणे भारताला विविध कलांची समृद्ध परंपरा असताना आपण कलादिन का साजरा करीत नाही, असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे १ जानेवारीला नाटककार अश्वघोष यांच्या स्मृत्यर्थ कलादिन साजरा करण्यास बोधी नाटय़परिषदेतर्फे सुरुवात केली आहे.

Story img Loader