जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना नागपुरातील संपन्नताच दिसावी, दारिद्र्य दिसू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाहुण्यांच्या मार्गावरील झोपड्या, टपऱ्यांसह आणि चौकाचौकात बसणाऱ्या भिकाऱ्यांना पोलिसांच्या मदतीने हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा- सावधान! उपराजधानीत चिकनगुनियाचा शिरकाव; नववर्षातील पहिला रुग्ण आढळला
शिखर परिषदेच्या निमित्ताने कधी नव्हे ते नागपूर नव्या नवरीसारखे सजू लागले आहे. वर्धा मार्गाचा तर कायापालटच केला जात आहे. रस्ते दुभाजकांमध्ये सुंदर झाडे लावण्यात आली आहे. रस्त्यालगतच्या झाडांना पांढरा रंग लावण्यात आला आहे. एक महिन्यापासून शहराच्या प्रमुख मार्गांलगतच्या भिंती सुंदर चित्रांनी सजवण्यात आल्या आहेत. मेट्रो मार्गिकेचे सिमेंटचे खांब त्यावर रेखाटलेल्या चित्रांनी लक्षवेधी ठरू लागले आहेत. एकूणच विदेशी पाहुण्यांना स्वच्छ – सुंदर नागपूर दाखवतानाच नागपूरच्या विकासाचा झगमगाटही त्यांना दिसावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पण हे करताना शहराची दुसरी बाजू त्यांच्या नजरेस पडणार नाही याची काळजीही घेतली जात आहे.
हेही वाचा- “…तेव्हा संजय राठोड पैसे घेतल्याशिवाय काम करत नव्हते”; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा गंभीर आरोप
रस्त्यालगतच्या फुटकळ विक्रेत्यांच्या टपऱ्या, दुकाने काढली जात असून त्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. विदेशी चमू मिहान-विशेष आर्थिक क्षेत्राला भेट देणार असून या मार्गावरील झोपड्याही काढण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्डी व इतर चौकात बसणाऱ्या भिकाऱ्यांनाही दोन दिवसासाठी इतरत्र हलवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका विशेष मोहीम हाती घेणार असून पोलिसांची मदतही घेतली जाणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा- नागपूर: राज्यात ‘एमएसएमई’मध्ये महिलांचा टक्का वाढला
२० व २१ मार्च या दोन दिवसाच्या दौऱ्यात विदेशी शिष्टमंडळ त्यांचा मुक्काम असलेल्या तारांकित हॉटेलपासून मिहान, फुटाळा तलाव, पेंच प्रकल्प व शहरातील प्रमुख स्थळांना भेटी देणार आहे. या स्थळांकडे जाणारे सर्व रस्ते यापूर्वीच गुळगुळीत करण्यात आले आहे. संपूर्ण प्रशासन या दौऱ्याच्या तयारीत व्यग्र आहे.
संत्र्यांचे ‘ब्रॅंण्डिग’ करा
नागपूरची ओळख संत्रानगरी आहे. अलीकडच्या काळात ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी नवी ओळख या शहराला मिळाली. जी-२० च्या निमित्ताने ‘ टायगर कॅपिटल’चे ब्रॅंडिग केले जात आहे. त्यासोबतच संत्र्यांचेही ‘ब्रॅंण्डिग’ करावे, अशी मागणी उत्पादकांची आहे.
हेही वाचा- नागपूर:‘एसटी’मध्ये बसचा तुटवडा! लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम; करोना काळात २ हजार बस भंगारात
‘जी-२०’ परिषदेच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने १० मार्चला विद्यार्थ्यांची ‘अभिरूप जी-२०’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासाठी निवडलेले विद्यार्थी परिषदेच्या सदस्य देशाचे राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान म्हणून ‘शाश्वत विकासात नागरी संस्थांची भूमिका’ विषयावर पाच मिनिटांचे संबोधन करणार आहे. याशिवाय सदस्य देशाचे नाम फलक, ध्वजवाहक म्हणून दोन विद्यार्थी सहभागी होतील तर उर्वरित चार विद्यार्थी प्रत्यक्ष सभागृहात त्या-त्या देशांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील.