लोकसत्ता टीम
नागपूर : सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. २७ नोव्हेंबरला विधिमंडळ सचिवालायचे कार्यालय उपराजधानीत सुरू होणार आहे.
सध्याच्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचे कामकाज दोन आठवडे निश्चित करण्यात आले आहे. ते तीन आठवड्याचे घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. विधानभवनात रंगरंगोटी केली जात आहे. खुर्च्या, मंत्र्यांची दालने सजवली जात आहेत. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवासस्थानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानांची देखभाल दुरुस्ती केली जात आहे.
आणखी वाचा-नागपूर : एका वाघाच्या शोधासाठी ६५ वनकर्मचारी, १५ ट्रॅप कॅमेरे
अधिवेशनापूर्वी एक आठवड्याआधी साधारणपणे विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू होते. त्यासाठी मुंबईतून कागदपत्रे व महत्त्वाच्या फाईल्स ट्रकद्वारे नागपुरातून आणली जात आहे. यासाठी २५ लोखंडी ट्रंक भाड्याने घेण्यात येणार आहे. दीड हजारांवर खरड्याचे खोक्यातून हे साहित्य आणले जाणार आहे. मुंबईतून अधिवेशनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था नेहमीप्रमाणे करण्यात आली आहे. विधानभवन परिसरात मंडप टाकण्याचे काम सुरू आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा रस्ता तयार केला जात आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नव्याने बंगला शोधण्यात आला असून त्याला विजयगड असे नाव देण्यात आले आहे. विधानभवनाचा विस्तार करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागच्या अधिवेशनात सांगितले होते. यासंदर्भात वर्षभरात काही बैठकाही झाल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावही दिले आहे.