प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : देशाचे गृहमंत्री तसेच भाजपचे चाणक्य म्हणून ओळख असणारे अमित शहा अकोला भेटीवर येणार आहे.१५ फेब्रुवारीस होणाऱ्या अकोला भेटीत ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या पक्षीय रचनेत पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघासोबत वर्धा जोडला आहे. या पाच मतदारसंघाचे क्लस्टर करण्यात आले असून त्याचे प्रमुख आमदार मदन येरावार तर सहप्रमुख आमदार डॉ. रामदास आंबटकर हे आहेत. तसेच वर्धा क्षेत्राचे प्रभारी जयप्रकाश गुप्ता तर सहप्रभारी सुधीर दिवे आहेत. यांच्यासह डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी शहा यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी बैठक घेतली. त्यात शहा यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा सदर करण्याबाबत चर्चा झाली.
शहा हे हार्ड टास्क मास्टर म्हणून पक्षात ओळखल्या जातात. म्हणून कसलीच कसर राहू नये याची खबरदारी घेण्याची सूचना झाली. पक्षाचे नव्हे तर निवडणुकीचे स्वतंत्र कार्यालय राहणार. तिथे वॉर रूम तयार करायची आहे. सर्व अद्यावत सुविधा तसेच बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसह कार्यकर्ते तसेच वाहन चालक यांच्या भोजन निवासाची व्यवस्था कशी करणार, याचे टिपण द्यायचे आहे. पार्किंग, एकूण गाड्या, वाहनचालक, सभेचे नियोजन, तिथे जाण्याचा मार्ग, मोठ्या व लहान सभेचे ठिकाण, जाहीर तसेच कॉर्नर सभा घेण्याचे नियोजन, स्टार प्रचारकांची संभाव्य यादी, बूथनिहाय व्यवस्था, तीन बूथ मिळून एक वॉरियरची नेमणूक, पाच झोपड्यांचा एक प्रमुख अश्या व अन्य बाबीवर अहवाल द्यायचा आहे.
आणखी वाचा-नोकरी लागताच पत्नीने केली घटस्फोटाची तयारी; प्रेमविवाहाचा करुण अंत होण्यापूर्वी सावरला संसार
शहा यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नावर निरुत्तर व्हायची वेळ यायला नको, अशी काळजी घेण्याचे ठरले. यांच्या सभेस वर्धा लोकसभा मतदारसंघातील सत्तर पदाधिकारी निमंत्रित असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले. त्यांची सर्व ती माहिती सुरक्षेच्या कारणास्तव आजच सादर केल्या जाणार आहे.१९९५ पासून लोकसभा निवडणुकीत पक्षीय कार्यात सहभागी असणारे एक नेते म्हणाले की कधी नव्हे ती यावेळी निवडणूक जिंकण्याची खबरदारी घेतल्या जात असल्याचे बघत आहे.
पक्षाचे वर्धा लोकसभा प्रभारी सुमित वानखेडे म्हणाले की शहा यांच्या बैठकीची सर्व ती तयारी काळजीपूर्वक घेत आहोत. माझ्या सह काही पदाधिकारी आजच रात्री शेगाव येथे दर्शन घेऊन नंतर अकोल्यात पोहचणार असून उर्वरित थेट अकोल्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष म्हणाले. आढावा सभेत खासदार, आमदार, जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शहा यांची नाराजी ओढवू नये म्हणून अपेक्षित ती सर्व माहिती एका छापील पुस्तिकेत सादर केल्या जाणार. बोलण्याची संधी मिळणार की नाही ते निश्चित नाही. सादर केलेल्या लेखी आढाव्यावर शहा प्रश्न विचारू शकतात. म्हणून जबाबदार नेते आताच घामागुम झाल्याचे दिसून आले.